Rang Panchami : इंदापुरात रंगांचा महापूर! १४० गावांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष; पाहा ग्रामीण भागातील ‘रंग’तदार सण
Rang Panchami : धूलिवंदनापासून सुरू झालेल्या उत्सवाची रंगपंचमीने झाली सांगता; इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला वसंतोत्सव.

Rang Panchami – रंगुनी जाऊ रंगात आता, अखंड उठू दे मनी तरंग… तोडून सारे बंधन असे उधळू या आज हे रंग…!” या ओळींसह आनंदी वातावरणात इंदापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रविवारी रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी एकमेकांना रंग लावत आनंदाची उधळण केली.
अबालवृद्धांनी एकमेकांना रंगांची उधळण करत या वसंतोत्सवाचा आनंद लुटला. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या उत्सवाची सांगता रंगपंचमीने करण्याची परंपरा तालुक्यात यंदाही उत्साहात जपली गेली. सकाळपासूनच युवक आणि मुलांचे गट एकमेकांना रंग लावण्यासाठी बाहेर पडले होते. तालुक्यातील सुमारे १४० गावांमध्ये हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.
मित्रमंडळींना आवर्जून पकडून रंग लावण्याची आणि पाण्याचे फवारे उडवण्याची मजा सर्वत्र पाहायला मिळाली. तालुक्यातील बावडा, निमगाव केतकी, भिगवण आणि इंदापूर शहरात ढोल-ताशांच्या गजरात रंगपंचमी साजरी झाली. नैसर्गिक आणि विविध छटांच्या रंगांत न्हाऊन निघालेल्या या उत्सवाने समाजातील भेदभाव दूर सारून आपुलकी आणि प्रेमाचा संदेश दिला. केवळ वैयक्तिक आनंदच नव्हे, तर सामाजिक एकोप्याचे रंग या उत्सवामुळे अधिक गडद झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.





