Otur News | ओतूर बसस्थानक खड्ड्यांत..

प्रभात वृत्तसेवा
ओतूर – जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे प्रवेशद्वारावरच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचे बसस्थानक आहे. मात्र या बसस्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दरवर्षी त्याचा त्रास प्रवासी, नागरिक व विद्यार्थी यांना होत असतो. त्यामुळे याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात येत असल्याची माहिती शिवनेरीचे शिलेदार समूहाचे पोपट नलावडे यांनी दिली.
शिवजन्मभूमीतील जुन्नर तालुक्यातील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील ओतूर येथे श्रावण महिन्यात ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिरात श्रावण यात्रेत दर सोमवारी तयार होणार्या कलात्मक पिंडींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भावीक या यात्रेला येत असतात. तसेच जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी आहे. त्यामुळे अनेक भाविक भक्त याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु ओतूरच्या प्रवेशद्वारावरच बसस्थानक आहे, यात्रेला येणारा प्रत्येक भाविक, नागरिक, व्यावसायिक, नोकरदार व विद्यार्थी याच ठिकाणाहून गावात प्रवेश करत असतात. मात्र, त्यावेळीच त्याचं स्वागत खड्डेमय रस्त्यातून होत आहे.
गेली 10 ते 12 वर्षे दर पावसाळ्यात या बसस्थानकात परिसरात गुडघाभर खड्डे पडलेले असतात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक ज्येेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी या खड्ड्यांत पडून जखमी देखील झाले आहेत. आवाज उठवल्यावर पाच दहा ट्रॉली मुरूम टाकून आमच्या तोंडाला पाने पुसली जातात; परंतु यावर ठोस उपाययोजना होणे आवश्यक असून प्रशासनाने संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी मागणी ओतूरकर ग्रामस्थांनी, प्रवाशांनी केली आहे.





