…अन्यथा हॉटेल व्यावसायिकांना 50 हजारांचा दंड

नियम न पाळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर होणार कारवाई
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांचे हॉटेल चालकांकडून पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी पथके स्थापन केली जाणार आहेत. ही पथके हॉटेलची तपासणी करणार असून यामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 50 हजार रुपयांचा दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच, दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास हॉटेल परवाना काही दिवसांसाठी निलंबित आणि जर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
करोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विभागीय आयुक्त राव यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.
आयुक्त राव यांनी सांगितले की, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु आहे का, प्रवेश करण्याच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था, थर्मलगनद्वारे शरीराचे तापमान तपासणे, हवा खेळती, आवश्यक ते सामाजिक अंतर, डिजिटल पेमेंटला प्राधान्य, चांगल्या प्रतीचे पेपर नॅपकीन, वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आदी मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन होते की नाही. यावर लक्ष ठेवण्याबरोबच नियमांच्या अंमलबजावणीचे काम विशेष पथक करणार आहे. शहरामधील पथकामध्ये मनपाचे कर्मचारी, उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि पोलीस यांचा समावेश असणार आहे. तर, ग्रामीण भागात महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
हॉटेल व्यवसायात नियमांचे उल्लंघन झाल्यास करोना रुग्णांची संख्या वाढू शकते. त्याचा मोठा फटका बसू शकतो. यातून आरोग्य यंत्रणेला ताण सहन करावा लागू शकतो. यापार्श्वभूमीवर हॉटेलची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांना विश्वासात घेतले जाणार आहे. शहरात कारवाईचे अधिकार पालिकेला तर ग्रामीण भागातील हॉटेलवर कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले.



