Satara : सातारा शहरातील टोळीला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश; पोलीसांचा दणका
Satara : दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, हाणामारीसह गंभीर गुन्ह्यांची नोंद

सातारा : दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, शिवीगाळ-दमदाटी, बेकायदा जमाव, हत्यारांचा वापर आणि अवैध दारू विक्रीसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी सातारा शहर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सात जणांच्या टोळीवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण निखील पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये या टोळीला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला.
तडीपार करण्यात आलेल्यांची नावे
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख ऋषिकेश ऊर्फ दादा शशिकांत पवार (वय २२, रा. काळोशी, कोडोली) याच्यासह जितेंद्र दीपक सुर्वे (२२), पृथ्वीराज भीमराव साळुंखे, संदीप दादा वलेकर (२२), अनिकेत दादा वलेकर (२२) (सर्व रा. कोडोली, सातारा), प्रेम ऊर्फ बबलू विलास पार्टे (२४, रा. मेढा) आणि सिद्धार्थ विवेक महाडिक (१८, रा. कोडोली) यांचा समावेश आहे.
या टोळीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, दुखापत करून शिवीगाळ व दमदाटी, अनधिकृत प्रवेश, हत्यारानिशी बेकायदा जमावाचा घटक होणे तसेच अवैध दारू विक्री यांसारखे दाखलपात्र गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही टोळीच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. या प्रस्तावाची चौकशी सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी केली.
सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सातही जणांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही तडीपारी, मोक्का आणि एमपीडीए यांसारख्या कठोर कारवाया केल्या जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तसेच पोलीस कर्मचारी आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पुरावे सादर करून कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा:





