नवी दिल्ली – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान यांना केंद्रीय कृषिमंत्री करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीला संयुक्त किसान मोर्चाने विरोध दर्शवला आहे. त्यासाठी ७ वर्षांपूर्वीच्या मंदसौर गोळीबाराचा आधार घेण्यात आला आहे. शिवराज मुख्यमंत्री असताना मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये जून २०१७ मध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने केली होती. त्यावेळी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी निदर्शकांवर गोळीबार केला. त्यामध्ये ६ शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्याचा संदर्भ देऊन संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी केले. त्यामध्ये मंदसौरमधील घटनेसाठी शिवराज यांना जबाबदार धरण्यात आले. केंद्रातील एनडीए सरकारच्या मागील २ कार्यकाळांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यातून आलेल्या अहंकार आणि असंवेदनशीलतेचे प्रतीक म्हणजे आताच्या कृषिमंत्र्यांची नियुक्ती आहे, अशी नाराजी निवेदनातून व्यक्त करण्यात आली. संयुक्त किसान मोर्चामध्ये देशभरातील अनेक शेतकरी संघटनांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व मोर्चाने केले होते.