जंतर-मंतरवर विरोधकांचे आंदोलन; बेरोजगारी, वाढती महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन

नवी दिल्ली – संसदेत खासदारांच्या निलंबनाचे पडसाद आज राजधानीतील जंतर-मंतरवर बघायला मिळाले. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वच विरोधक एकत्र आले होते. बेरोजगारी, वाढती महागाई आणि संसदेच्या घुसखोरी प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी तीव्र आंदोलन केले.
संसदेतील विरोधी खासदारांच्या निलंबनाविरोधात शुक्रवारी (22 डिसेंबर) इंडियातील घटक पक्ष जंतरमंतर येथे जमले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते लोकशाही वाचवा आंदोलनात उपस्थित होते. खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडीने पक्ष कार्यकर्त्यांना देशभरात आंदोलन करण्यास सांगितले आहे.
संसदेतील सुरक्षेतील त्रुटींबाबत राहुल गांधी म्हणाले की, जे लोक स्वतःला देशभक्त म्हणवून घेतात त्यांची हवाच गेली आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांनी संसद भवनात उड्या मारल्या. आम्ही सर्वांनी त्यांना उडी मारताना पाहिले. ते आत आले, थोडा धूर पसरला, भाजपचे सर्व खासदार पळून गेले… जे स्वत:ला देशभक्त म्हणवतात त्यांची हवाच गेली.
ते म्हणाले, सध्या देशातील तरुणांचा सर्वाधिक वेळ हा मोबाइलवर इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर पाहण्यात जातो. एका दिवसात सरासरी साडेसात तास हा कालावधी आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशातील तरुण साडेसात तास मोबाइलवर बसतात. कारण त्यांच्याकडे रोजगार नाही. ही भारताची खरी स्थिती आहे. यामुळे त्या तरुणांनी संसदेत उडी मारली.
देशात बेरोजगारी आहे, याचा उल्लेख प्रसारमाध्यमांमध्ये झाला नाही. मीडियाने सांगितले की, खासदार संसदेच्या बाहेर बसले होते, तिथे राहुल गांधींनी व्हिडिओ काढला. म्हणजे दीडशे खासदारांना संसदेबाहेर फेकले, असे त्यांनी म्हटले नाही, ते का केले, कसे केले, असे प्रश्नही माध्यमांनी उपस्थित केले नाहीत.
आम्ही अमित शहांना प्रश्न विचारला – भाऊ, तुम्ही गृहमंत्री आहात, हे दोन तरुण उडी मारून कसे आले, बेरोजगारीवर दोन प्रश्न विचारले तर त्यांनी दीडशे लोकांना उचलून हाकलून दिले. हे केवळ 150 लोक नाहीत, ते भारतातील लोकांचा आवाज आहेत.





