nagar | खासदार सदाशिव लोखंडे यांंना विरोध

शिर्डी, (प्रतिनिधी) – ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून सुरू असलेली धुसफूस तर दुसरीकडे महायुतीतील जागा वाटपावरून सुरू असलेला अंतर्गत कलह यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
अशातच शिर्डी लोकसभा मतदार संघातून सलग दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार सदाशिव लोखंडेंना पहिला धक्का बसला तो शिर्डीचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे समर्थक यांच्याकडून. त्यांनी ही जागा भाजपसाठी सोडावी, याची केलेली मागणी तर दुसरीकडे शिंदे गटातील अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांनी एकाकी दिलेले राजीनामे व ते देताना दिलेली कारणेामुळे सध्या लोखंडे यांच्या उमेदवारीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अर्थात खासदार लोखंडे यांनी पक्षवाढीसाठी काहीही प्रयत्न केले नाही. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना निष्ठावंतांना विश्वासात घेतले नाही, जनसंपर्क केला नाही यासह अनेक गंभीर आरोप शिवसेनेचे नेते विजय जगताप व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अर्थात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा सिलसिला सहा ते सात तालुक्यात सुरू असून लोखंडे यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशातच आता पक्षश्रेष्ठी किंव्हा महायुती यावर काय तोडगा काढते अथवा निर्णय घेते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेची ताकद नसताना सुद्धा शिर्डी लोकसभा मतदारसंघात सलग तीनवेळा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आलेला असताना आता मात्र चौथ्यावेळी काय चित्र असणार याची उत्सुकता अनेकांना लागून आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित झाली आहे तर त्यांचे प्रचार दौरे सुरू झाले आहे.
मात्र, खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे महायुतीचे मुख्य घटक असताना त्यांनी केलेली मागणी व शिंदे गटातील शिर्डी मतदारसंघातील राजीनाम्याचे सत्र यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे महत्वाचे ठरणारआहे. असे असले तरी कधीही प्रसारमाध्यमांपासून दूर राहणारे सदाशिव लोखंडे यांच्या दहा वर्षाच्या कामकाजाचा आढावा घ्यावा व नंतरच भाष्य करावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी केले आहे. महायुतीचा कोणताही उमेदवार द्या, मी प्रामाणिकपणे काम करण्याचे वचन देतो असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे .
एकंदरीतच लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये केंद्रीयमंत्री रामदास आठवले, उत्कर्षा रूपवते, सदाशिव लोखंडे, बबनराव घोलप किंव्हा त्यांचे चिरंजीव या दिग्गजांसह अनेकांची लॉबिंग महायुतीकडून तिकीट मिळण्यासाठी सुरू आहे. मात्र शिवसेनेतील आपापसातील धुसफूस नेमकी कुणाच्या पथ्यावर पडते हाच खरा प्रश्न पडला आहे. आगामी काळात आणखीन किती राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





