प्रभात वृत्तसेवा शिर्डी – श्री साईबाबा संस्थान प्रशासनावर गंभीर आरोपांची झळ पोहोचली आहे. साई आश्रम प्रकल्पातील तब्बल ७७ लाख १३ हजार रुपयांच्या विद्युत साहित्याच्या अपहारप्रकरणी संस्थानचे ४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिसांनी केली. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. श्री साई संस्थानच्या अखत्यारीतील साई आश्रम संकुलात २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत साहित्य चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात संस्थानकडून योग्य कारवाई न झाल्याने तक्रारदार संजय काळे यांनी उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने सुनावणीनंतर तक्रारीवरील पुरावे पाहून शिर्डी पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांनी बिलं, स्टोअर रेकॉर्ड्स आणि पुरावे तपासायला सुरुवात केली आहे. संस्थानमधील विभागप्रमुख आणि ठेकेदार यांच्या संगनमताने विद्युत साहित्याची चोरी करून खोटी बिलं तयार करण्यात आली, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आम्ही दोन वर्षांपासून न्यायासाठी लढत आहोत. अखेर न्यायालयाने आमच्या तक्रारीची दखल घेतली. साई संस्थानच्या निधीतून भाविकांच्या पैशांचा अपहार झाला आहे. आज न्याय मिळण्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, असे तक्रारदार संजय काळे यांनी म्हटले आहे. “श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती यांची दिनांक ८ मे रोजी सभेतील निर्णयानुसार लेखा विभागाने सादर केलेल्या ५ मे रोजीच्या अहवालातील परिशिष्ट अ नुसार ज्या रकमेची कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अनियमितता झाली आहे, त्या रकमा श्री साई संस्थानने यापूर्वीच १५ मे रोजीच्या नोटिसानुसार कर्मचाऱ्यांकडून विद्युत साहित्य रिकव्हरी या बेसवर वसूल केलेल्या आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी संस्थांनमध्ये चोरी केलेली नाही. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबी समोरील येतील.” -अरुण जाधव,अध्यक्ष,श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटना