Ashok Kharat Case : लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या कुटुंबावर आता नवा गंभीर आरोप समोर आला आहे. शिर्डी परिसरातील एका सामान्य शेतकऱ्याची कोट्यावधी रुपयांची जमीन सावकारीच्या नावाखाली बळकावल्याच्या प्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी आणि आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून, खरातच्या पत्नीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. प्रकरण नेमके काय? रावसाहेब गोंदकर या सामान्य शेतकऱ्याला सावकारीच्या जाळ्यात अडकवून अशोक खरात (Ashok Kharat Case) याने त्याची मोठ्या प्रमाणात जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात एकूण पाच जणांचा समावेश आहे. अशोक खरात, त्याची पत्नी आणि तीन इतर आरोपी. Ashok Kharat Case पोलिसांनी यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना राहाता न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरात सध्या नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिसांनी त्यालाही न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांचे विधान अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले की, “या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी आणि आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. अशोक खरातला न्यायालयाच्या परवानगीनंतर ताब्यात घेतले जाईल. आम्ही या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहोत. तक्रारदाराला अत्यधिक व्याजदराने पैसे दिले गेले आणि त्याच्या बदल्यात जमीन बळकावण्यात आली आहे.” आरोपींच्या वकिलांचे म्हणणे आरोपी अरविंद भावके यांचे वकिल व्यंकटेश खिस्ते यांनी सांगितले की, “आरोपी अरविंद भावके यांचा या व्यवहाराशी प्रत्यक्ष संबंध आढळला नाही. कोर्टासमोर विसंगती आणि त्रुटी सादर केल्या गेल्या. पोलिसांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, पण कोर्टाने फक्त गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणात अशोक खरात आणि त्याच्या पत्नीचे नाव आहे. त्यामुळे खरातच्या पत्नीला अटक होण्याची शक्यता आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करता येणार नाही.” भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या कृत्यांमुळे आता त्याचे संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे. शेतकऱ्याची जमीन बळकावण्याच्या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून, न्याय मिळवण्यासाठी तक्रारदार शेतकरी रावसाहेब गोंदकर यांना आशा वाटू लागली आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कसा पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.