Operation Sindoor : “विमाने गमावण्यावरून देशाची दिशाभूल”; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

Operation Sindoor – ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने काही लढाऊ विमाने गमावल्याचे वक्तव्य कथितपणे एका भारतीय नौदल अधिकाऱ्याने केले. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारने देशाची दिशाभूल केल्याचा आरोप त्या पक्षाकडून करण्यात आला.
इंडोनेशियात नुकताच एक परिसंवाद साधला. त्यामध्ये भारतीय नौदलाचे कॅप्टन शिव कुमार सहभागी झाले. त्यामध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूरविषयीचा गौप्यस्फोट केला. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी ७ मेच्या रात्री पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले.
त्यावेळी हवाई दलाने काही विमाने गमावली, असे शिव कुमार यांनी नमूद केल्याचा दावा एका वृत्तामधून करण्यात आला आहे. त्यावरून कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी मोदी सरकारला घेरले.
काही दिवसांपूर्वी संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी सर्वप्रथम भारताने विमाने गमावल्याचे मान्य केले होते. त्याचा संदर्भही कॉंग्रेस नेत्यांनी दिला. याआधी संरक्षण दलप्रमुखांनी सिंगापूरमध्ये महत्वाचा खुलासा केला.
आता इंडोनेशियात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ती बाब पुढे नेली. तसे असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यास आणि विरोधकांना विश्वासात घेण्यास नकार का दर्शवत आहेत? संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी का फेटाळण्यात आली, असे प्रश्न रमेश यांनी उपस्थित केले.
मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरविषयी सुरूवातीपासूनच देशाची दिशाभूल केली. विमाने गमावल्याविषयीची माहिती सरकारने उघड केली नाही. आता शिव कुमार यांनी केलेले वक्तव्य धक्कादायक स्वरूपाचे आहे. राजकीय नेतृत्वाने मर्यादा आणल्याने काही विमाने गमवावी लागल्याचे त्यांनी म्हटले.
ते वक्तव्य म्हणजे मोदी सरकारवरील आणि विशेषत: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावरील थेट ठपका आहे. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी सरकारने फेटाळण्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्याचे सरकारला ठाऊक आहे. कॉंग्रेस पक्ष देशातील जनतेसमोर काय उघड करेल याविषयी सरकारला धास्ती आहे, असा दावा खेडा यांनी केला. रमेश यांनी सोशल मीडियावरून शिव कुमार यांच्या वक्तव्याशी संबंधित वृत्तही शेअर केले.
ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभी पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना किंवा हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य न करण्याचा राजकीय आदेश होता. संघर्ष चिघळू नये या उद्देशातून तो आदेश देण्यात आला. त्यामुळे प्रारंभी हवाई दलावर ऑपरेशन सिंदूर राबवताना मर्यादा आल्याचे त्या वक्तव्यातून सूचित झाले.





