Open Gym Ravet: महापालिकेचा भोंगळ कारभार समोर! रावेतमध्ये ओपन जिमची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष
Open Gym Ravet: रावेतमधील मस्के वस्ती येथील ओपन जिमची स्वच्छता आणि देखभालीअभावी दुरवस्था; साहित्याची मोडतोड अन् गवताचे साम्राज्य.

Open Gym Ravet: परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि नियमित व्यायामासाठी उभारण्यात आलेल्या मस्के वस्ती येथील ओपन जिमची सध्या दुरवस्था झाली आहे. जिम परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. परिणामी सकाळी व्यायाम व कसरतीसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाढलेल्या गवतामुळे साप व इतर सरपटणारे प्राणी येण्याचा धोकाही नागरिकांनी व्यक्त केला आहे. मस्के वस्ती परिसरातील ओपन जिममध्ये दररोज सकाळच्या वेळेत अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण व्यायामासाठी येतात. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरत असली, तरी सध्या परिसराच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
जिम परिसरातील गवत वाढल्याने ये-जा करणे आणि विविध व्यायामाच्या साधनांचा वापर करणेही काही प्रमाणात अडचणीचे झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः खुल्या वातावरणातील हा व्यायामाचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, परिसराची स्वच्छता आणि नियमित देखभाल होत नसल्याने अनेक नागरिकांना जिमचा वापर करण्यास मर्यादा येत आहेत. काही नागरिकांनी वाढलेल्या गवतामुळे सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित केला आहे.
क्रीडा विभागाचे दुर्लक्ष
महापालिकेच्या क्रीडा विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. परिसरातील ओपन जिमचे साहित्य अनेक ठिकाणी मोडकळीस आले आहे. तसेच साहित्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर गवत व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याठिकाणी व्यायाम करता येत नाही. साहित्याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेच्या क्रीडा विभागाची आहे. तर स्वच्छता करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र, या दोन्हीही विभागांनी येथील जिमकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.





