‘…तरच आंदोलन संपवून स्पर्धेत उतरू’; साक्षी मलिकने केला खुलासा

नवी दिल्ली -भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, आम्हाला न्याय मिळाला नाही, तसेच ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक झाली नाही, तर आमचे आंदोलन सुरूच राहील. जर ब्रिजभूषणप्रकरणी आम्हाला न्याय मिळाला तरच आंदोलन मागे घेऊ व आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ, असा खुलासा ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने केला आहे.
बबिता फोगटने आम्ही कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेल्याचे आरोप केले असून ते हास्यास्पद आहेत. ती स्वतः एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती आहे. मात्र, त्यापूर्वी ती देखील एक खेळाडू आहे हे तिने विसरू नये. आमच्या आंदोलनात फूट पाडण्याचे काम जे कोण लोक करत आहेत, त्यातही बबिताचा सहभाग असावा अशीच आता शंका येत आहे, असे साक्षीने म्हटले आहे.
पोलीस तपास सुरू आहे, न्यायालयातही प्रकरणे सुरू आहेत. तोपर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या विनंतीमुळे आम्ही हे आंदोलन स्थगित केले आहे. आता आमच्यासमोर आगामी काळात खूप स्पर्धा आहेत व त्यात आम्हाला सहभागी देखील व्हायचे आहे.
मात्र, आमच्या मागण्या मान्य झाल्या तसेच ब्रिजभूषण यांना अटक झाली तरच हे होऊ शकेल. आम्ही केणाच्याही हातातील बाहुले नाही व विकलोही गेलेलो नाही. येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमध्ये आशियाई स्पर्धा होत असून आम्हाला त्यात सहभागी व्हायचे आहे. मात्र, ते सगळे आमच्या हाती काय पडते त्यावर अवलंबून आहे, असेही साक्षीने म्हटले आहे.
वेळकाढूपणा कशासाठी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर 15 जून ही मुदत आम्ही दिली होती, ती देखील उलटून गेली आहे. इतके गंभीर गुन्हे दाखल होऊनही ब्रिजभूषण यांना अद्याप अटक का केली जात नाही तसेच हा वेळकाढूपणा कशासाठी, असा सवालही साक्षीने केला आहे.





