पुणे जिल्हा | भोर मतदार संघात इच्छुकांचीच हवा

विंझर, (वार्ताहर) – भोर विधानसभा मतदारसंघ २०३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भोर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १.भोर तालुका, २.राजगड तालुका व ३.मुळशी तालुका, अशा तीन तालुक्यांचा मिळून एक भोर मतदारसंघ आहे.
तीन तालुके असल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या इच्छूकांनी आपापल्या पक्षातर्फे तिकीट मिळविण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन मेळावे व बैठकांद्वारे दाखवणे सुरू केले आहे.
सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गावभेटी आणि जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीत भोर विधानसभा मतदार संघाच्या जागेवरून भोर विधानसभा मतदारसंघामधील जनतेमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
भोर विधानसभेत ज्यांची निवडून यायची क्षमता तोच उमेदवार, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भोर विधानसभेवर आपला दावा केलाय.
शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी भोरमधून शिवसंवाद दौरा करत, जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपल्या पक्षाची ताकत दाखवली आहे. तर दुसऱ्या बाजूला भोर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदार संघातून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे तीन वेळा निवडून आलेत आहेत.
मात्र, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदार संघावर दावा करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे.
दुसऱ्या बाजूला महायुतीचे इच्छुक उमेदवार पुण्यातील मनपा नगरसेवक किरण दगडे यांनी देखील महायुतीमधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली
असल्यामुळे त्यांच्या वतीने देखील भोर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध समाजपयोगी कार्यक्रम घेत असल्यामुळे भोर विधानसभेतील मतदारसंघातील जनतेमध्ये अनेक राजकीय चर्चा जोर धरत आहे.
जो तो पक्ष आपापल्या परीने केलेल्या विकासकामांची यादी, विविध समाजपयोगी घेतलेले कार्यक्रम यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आपापल्या पक्षाचे शक्तिप्रदर्शन जोरात करत आहेत.
शिवसेनेचा दावा…
याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वेल्हे तालुका प्रमुख दीपक दामगुडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी आणि महायुती असे जरी दोन्ही असेल तरी गेल्या पंचवार्षिक मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले होते.
आताची परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी फुटली आणि अर्धे कार्यकर्ते अजित पवार गटामध्ये गेले. उर्वरित कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे राहिले आहेत. त्यामुळे काँग्रेसची ताकत कमी झालेली आहे.
ठाकरे गटाची शिवसेना आहे. त्यामधून फक्त १० ते १५ % लोक बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आमचा मतदार संघावर दावा आहे. त्यामुळे उद्या जागावाटपाबाबत काही निर्णय झाला तरी आम्ही मित्र लढत करणार आहे. संघटनात्मक आमच्या पक्षाची बांधणी असल्यामुळे या मतदारसंघावर आमचा दावा आहे.





