पुणे जिल्हा : भोर मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी माझी

अजित पवार : शंकर मांडेकर यांचा प्रचारार्थ भोर येथे प्रचारसभा
भोर – सत्ता असूनही येथील आमदारांना विकासकामे करता आली नाही. जिल्ह्यात सर्वात मागे राहिलेल्या तालुक्यांमध्ये भोर-राजगड तालुक्यांचा समावेश होतो. या तालुक्यांचा मागासलेपणाचा शिक्का पुसायचा असेल तर महायुतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच पुढील वर्षात पाच हजार कोटींचा निधी भोर मतदारसंघाला देतो, या मतदारसंघाचा विकास करायची जबाबदारी माझी आहे, हा अजित पवारचा वादा आहे, असा शब्दात त्यांनी मतदारांची मने जिंकली.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांचा प्रचारार्थ भोर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भोर आणि राजगड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. सभेपूर्वी भोरमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करून मांडेकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, माजी सभापती चंद्रकांत बाठे, रेवननाथ दारवटकर, भगवान पासलकर, किरण राऊत, शंकर भुरुक, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, किरण राऊत, अंकुश मोरे, शांताराम इंगवले, बाळासाहेब चांदेरे, राजाभाऊ हागवणे, सुनील चांदेरे, प्रमोद निम्हण, नितीनबापू थोपटे, श्रीकांत कदम, यशवंत डाळ, निर्मलाताई जागडे, कीर्ती देशमुख, पुनम विधाते, सारिका मांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मागील पंधरा वर्षात इथल्या आमदारांनी जेवढा निधी आणला नाही, त्यापेक्षा जास्त निधी हा पुढच्या पाच वर्षात आणेल. राज्यात महायुतीची सत्ता येणार असून विकासासाठी भोर-राजगड-मुळशी तालुक्यातील मतदारांनी यंदा परिवर्तन घडवा, असे आवाहनही पवार यांनी केले.
आपल्या मतदार संघाचा विकास करणे हे आमदारांचे कर्तव्य असते. चांगले नेतृत्व नसल्याने या मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही. मला काम करण्याची संधी द्या. मी आठवड्यातले चार दिवस भोर-राजगड या दोन तालुक्यासाठी देईल, आणि तुम्हाला बदल घडवून दाखवेल हा माझा शब्द आहे.
-शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार





