भोर मतदारसंघात काँग्रेसला धक्का; सतीश चव्हाणांच्या हातावर अजितदादांचे घड्याळ

भोर – ऐन विधानसभा निवडणुकीत भोर मतदारसंघात काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय. भोरचे काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य सतीश चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. सतीश चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भोर विधानसभेत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तालुक्याचा रखडलेला विकास यामुळे चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
त्यांच्या या निर्णयामुळे भोर, राजगड या दोन तालुक्यांत महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांचे पारडे जड होणार आहे. सलग पंधरा वर्षे मतदार संघातील सत्ता असतानाही काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
या नाराजीला वाट करून देत चव्हाण यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोरमध्ये होणार्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत काँग्रेस मधील कार्यकर्त्यांचा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भोर विधानसभेत परिवर्तन नक्की होणार, असे महायुतीचे पदाधिकारी सांगत आहेत.





