45 लाख नागरिकांसाठी फक्त 577 बेड; महापालिकेची आरोग्य सेवा पुणेकरांपासून दूरच

पुणे – नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा देणे हे प्राथमिक कार्य असले, तरी महापालिकेच्या रुग्णालयांची स्थिती आणि सुविधा कुचकामी ठरत आहेत. शहरात महापालिकेच्या 22 रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची सुविधा आहे. येथील बेडची क्षमता सुमारे 1,376 असली, तरी त्यातील केवळ 577 बेड कार्यान्वित आहेत.
मनपा रुग्णालयांतील कार्यान्वित खाटांमधील 380 बेड हे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या उपचारासाठी असून इतर रुग्णांसाठी अवघ्या 197 बेड उपलब्ध आहेत. तर, क्षमता असून सुमारे 799 बेड आवश्यक असलेल्या सुविधा नसल्याने बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी पालिका दरवर्षी 500 कोटी रुपयांहून अधिक खर्च करत असली, तरी सर्वसामान्यांपासून ही आरोग्यसेवा दुरावल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन (गवनि) विभागाच्या अहवालानुसार, शहरातील सुमारे 25 ते 30 टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. प्रत्यक्षात या नागरिकांचे उत्पन्नाचे साधन मजुरी आणि हाताला मिळेल, ते काम असल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय उपचार परवडत नाहीत. अशा स्थितीत या नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मनपा रुग्णालयांचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, तेथे उपचारांसाठी आवश्यक पुरेसे वैद्यकीय तज्ज्ञ आणि मनुष्यबळ नसल्याने महापालिकेकडून हे बेड बंद ठेवण्यातच धन्यता मानली आहे.
“शहरी गरीब’च्या नावाखाली झटकली जबाबदारी
सर्वसामान्य रुग्णांसाठी सध्या प्रसूती, हाडांचे उपचार, डोळ्यांचे उपचार, डायलिसिस, हृदय रोगाचे उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातात. त्या व्यतिरिक्त इतर गंभीर आजार आणि शस्त्रक्रियांसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. प्रत्यक्षात महापालिकेचा आरोग्य सेवेवरील खर्च पाहता, सर्व प्रकारच्या आजारांसाठी पालिका वैद्यकीय सेवा पुरवू शकते. मात्र, शहरी गरीब योजनेच्या नावाखाली महापालिकेने ही जबाबदारी एक प्रकारे झटकली आहे. या योजनेतही संपूर्ण कुटूंबाला 1 लाखापर्यंत, तर काही आजारांपर्यंत 2 लाखांचा खर्च पूर्ण वर्षभरासाठी दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात हा खर्च पाच ते दहा लाखांपेक्षाही अधिक असल्याने तो सर्वसामान्यांना परवडत नसल्याने त्यांना जीव गमवावा लागतो.
अशी आहे बेडची सद्यस्थिती
एकूण रुग्णालये- 22
एकूण बेड – 1,376
कार्यान्वित बेड- 577
प्रसूतीसाठीचे बेड
(कार्यान्वितपैकी) – 380
अकार्यान्वित बेड – 799





