Mahapalika Elections : राज्यात भाजपची तर मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला; गेल्यावेळी कोणाच्या ताब्यात किती महापालिका?

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अखेर मंगळवारी थांबली आहे. गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून शुक्रवारी 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. यंदा एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
या निवडणुकांमध्ये राज्यभरात भाजपची प्रतिष्ठा, तर मुंबईत ठाकरे बंधूंची राजकीय कसोटी लागणार आहे. त्यामुळे निकाल काय लागतो, याबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र, याआधीच्या महापालिका निवडणुकांमध्ये नेमकी स्थिती काय होती, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं.
गेल्यावेळी किती महापालिकांसाठी निवडणूक झाली होती?
मागील महापालिका निवडणुकीत 27 महापालिकांसाठी मतदान झालं होतं. यंदा जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांची भर पडल्याने एकूण संख्या 29 झाली आहे.
गेल्या निवडणुकीतील सत्ता-समीकरण
मागील निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी करत 17 महापालिकांमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली होती.
तर 3 महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती. शिवसेनेला फक्त 2 महापालिका मिळाल्या होत्या. तर 4 महापालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता, 1 महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी युती, तर 1 महापालिका बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात होती. या पार्श्वभूमीवर यंदाही भाजप आपला दबदबा कायम ठेवणार का, की विरोधक पुनरागमन करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गेल्यावेळी कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता होती?
मुंबई (227) – शिवसेना
ठाणे (131) – शिवसेना
कल्याण-डोंबिवली (122) – शिवसेना-भाजप
अहिल्यानगर (68) – शिवसेना-भाजप
छत्रपती संभाजीनगर (113) – शिवसेना-भाजप
नवी मुंबई (111) – भाजप
उल्हासनगर (78) – भाजप
मिरा-भाईंदर (96) – भाजप
पनवेल (78) – भाजप
नाशिक (122) – भाजप
जळगाव (75) – भाजप
धुळे (74) – भाजप
मालेगाव (84) – भाजप
पुणे (42 / एकूण 162 नगरसेवक) – भाजप
पिंपरी-चिंचवड (32 / एकूण 128 नगरसेवक) – भाजप
सोलापूर (113) – भाजप
सांगली-मिरज-कुपवाड (78) – भाजप
लातूर (70) – भाजप
अमरावती (87)- भाजप
अकोला (80) – भाजप
नागपूर (151) – भाजप
चंद्रपूर (66) – भाजप
भिवंडी-निजामपूर (90) – काँग्रेस
नांदेड-वाघाळा (81) – काँग्रेस
परभणी (65) – काँग्रेस
वसई-विरार (29 / एकूण 115 नगरसेवक) – बहुजन विकास आघाडी
कोल्हापूर (92) – काँग्रेस-राष्ट्रवादी
इचलकरंजी (76) – नवी महापालिका
जालना (65) – नवी महापालिका





