पुणेकरांनो थोडं जपूनच,फक्त 378 ऑक्सिजन बेड शिल्लक

पुणे – शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाला असून, रोजचे बाधित आणि गंभीर रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता केवळ 378 बेडच शिल्लक असल्याची माहिती महापलिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात करोनाच्या रुग्णांसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत ऑक्सिजनचे 3 हजार 344 बेड उपलब्ध असून, त्यापैकी केवळ 10 टक्के बेड शिल्लक आहेत. शहरात 8 शासकीय आणि 86 खासगी रुग्णालयांत सर्व प्रकारची मिळून 5 हजार 17 बेड उपलब्ध आहेत. सरकारी रुग्णालयांपैकी औंध-बाणेर हॉस्पिटल, जम्बो हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, दळवी हॉस्पिटल, द्रोपदाबाई खेडेकर हॉस्पिटल, लायगुडे हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल आणि सोनावणे हॉस्पिटल आहेत. तर खासगीमध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, जहांगिर, केईएम, रूबी हॉल क्लिनिक, इनलॅक्स, सह्याद्री यांसह 86 खासगी हॉस्पिटल्सचा समावेश आहे.
445 व्हेंटिलेटर बेड
शहरात करोनासाठी खासगी आणि सरकारी रुग्णालयांत मिळून 445 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ 30 च बेड शिल्लक आहेत. अतिदक्षता विभागाचीही तीच परिस्थिती असून, 322 पैकी 27 च बेड रिक्त आहेत.
ज्या खासगी रुग्णालयांना त्यांची रुग्णालये कोविडमध्ये परावर्तित करायची आहेत ते करू शकतात. त्यांच्याकडे अगदी 10 बेड जरी ऑक्सिजनचे असतील तरीही त्यांना परवानगी देण्यात येईल. मात्र या रुग्णालयांकडे फिजिशियन्स हवेत.
– डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा






