Online Admission Process : अकरावी प्रवेशाची हेल्पलाइन ‘कुचकामी’! तांत्रिक अडचणींमुळे पालक-विद्यार्थी हवालदिल
Online Admission Process : दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी धावपळ सुरू; अपुरी इंटरनेट सेवा आणि बँक सर्व्हरमधील बिघाडामुळे तांत्रिक पेच.

Online Admission Process – राज्य शिक्षण संचालनालयाच्या वतीने इयत्ता अकरावीसाठी राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रवेश प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने दिलेला हेल्पलाइन क्रमांक केवळ ‘शोभेची बाहुली’ ठरला असून, या हेल्पलाइनवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी कक्ष सुरू केले असले, तरी अपुरी इंटरनेट सेवा आणि बँकांच्या सर्व्हरमधील बिघाड यामुळे विद्यार्थ्यांची माहिती भरताना व शुल्क जमा करताना अनेक तांत्रिक समस्या येत आहेत.
प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी शिक्षण संचालनालयाने ८५३०९५५५६४ हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. मात्र, या क्रमांकावर संपर्क साधला असता दिवसभर केवळ ‘कॉलर ट्यून’चे संगीत ऐकू येते, प्रत्यक्षात कोणीही फोन उचलत नाही, अशी तक्रार पालकांनी केली आहे. मदत मिळण्याऐवजी वेळ वाया जात असल्याने ही यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली आहे.
ऑनलाइन प्रक्रिया केवळ महापालिका हद्दीतच ठेवा
ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक मर्यादा लक्षात घेता, ही ऑनलाइन प्रक्रिया संपूर्ण राज्यासाठी न राबवता पूर्वीप्रमाणे केवळ महानगरपालिका क्षेत्रापुरतीच मर्यादित ठेवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. केवळ औपचारिकता म्हणून हेल्पलाइन देण्यापेक्षा प्रशासनाने प्रत्यक्ष अडचणी सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील पालकांनी व्यक्त केली आहे.





