Onion Storage Damage : अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत टाकला युरिया; ६०० गोणी कांदा सडला, शेतकरी हवालदिल
Onion Storage Damage : बाजारभावाअभावी साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा माल मातीमोल; कोणाशीही वाद नसताना केलेल्या या कृत्यामुळे शेतकरी कुटुंब अडचणीत.

Onion Storage Damage – येडगाव-नारायणगाव रस्त्यावरील शेतकरी सावता चिमाजी कोल्हे यांच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया टाकून ६०० गोणी कांद्याचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे साठवलेला कांदा खराब झाला असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने नारायणगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावता कोल्हे यांच्या अडीच एकर शेतीमध्ये श्रीहरी बनकर यांनी अर्ध्या वाट्याने कांद्याची लागवड केली होती. सध्या बाजारात कांद्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी हा माल चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी चाळीची पाहणी केली असता, चाळीच्या वर चढून कुणीतरी ओला युरिया टाकल्याचे दिसले. युरियामुळे कांदा सडण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
कांदा मालकाचा कोणाशीही पूर्ववाद नसताना हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच बाजारभाव नसल्याने संकटात असलेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे मोठे संकट कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हेमंत कोल्हे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.





