Pune District : कांदा तेजीत; इंदापुरात 52 रुपयांपर्यंत दर
Pune District : उत्पादन खर्च, बाजारातील चढ-उतार आणि दरातील अनिश्चिततेमुळे कांदा उत्पादकांना अनेकदा आर्थिक फटका बसतो

इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात अचानक तेजी आल्याने इंदापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला 50 ते 52 रुपये किलो, तर हलक्या प्रतीच्या कांद्याला 35 ते 40 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे यापूर्वी कांदा साठवून ठेवलेल्या शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत आहे.
उत्पादन खर्च, बाजारातील चढ-उतार आणि दरातील अनिश्चिततेमुळे कांदा उत्पादकांना अनेकदा आर्थिक फटका बसतो. मात्र, सध्या मिळत असलेला चांगला बाजारभाव साठवणूक केलेल्या शेतकर्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरत आहे. दरवाढीमुळे बाजार समितीतील कांद्याची आवक आणि लिलावाकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
इंदापूर तालुक्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या काळातही पाऊस लांबला, तर बाजारातील कांद्याची उपलब्धता आणि आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर आणखी वाढू शकतात, अशी चर्चा शेतकरी व व्यापारी वर्तुळात आहे. आवक मर्यादित राहिल्यास कांद्याचा दर 70 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी भविष्यातील दर आवक, मागणी, पावसाची स्थिती आणि बाजारातील परिस्थितीवर अवलंबून राहणार आहेत.
कांद्याच्या बाजारभावातील चढ-उताराचा थेट परिणाम उत्पादकांच्या अर्थकारणावर होतो. दर घसरला की शेतकर्यांना आर्थिक फटका बसतो, तर दर वाढला की साठवणूक केलेल्या उत्पादकांना आधार मिळतो. सध्याची तेजी अशा शेतकर्यांसाठी महत्त्वाची ठरत असली, तरी दर मोठ्या प्रमाणात वाढल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या स्वयंपाकघरातील खर्चावरही होऊ शकतो.
बाजार समितीतील दराकडे लक्ष
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमालाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू असून, कांद्याला मिळणार्या चांगल्या बाजारभावामुळे उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा कारभार सुरू आहे. सध्याच्या तेजीमुळे साठवणूक केलेल्या कांदा उत्पादकांना चांगला आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा असून, आगामी काळातील दरांकडे तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.





