Onion News – बांगलादेशनंतर भारतीय कांद्याचा सर्वात मोठा खरेदीदार असणाऱ्या श्रीलंकेने १० रुपये प्रति किलो असणारे आयात शुल्क आता ५० रुपयांपर्यंत वाढविले आहे. दरवर्षी स्थानिक कांदा बाजारात आल्यावर श्रीलंका सरकारकडून असा निर्णय घेतला जातो. दुसरीकडे बांगलादेशकडून थांबलेले परवाने देण्याचे काम एक-दोन दिवसांत सुरू होईल. देशांतर्गत बाजारात कांद्याची मागणी घटलेली असताना निर्यातीतील अस्थिरता स्थानिक बाजारावर परिणाम करीत आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात मागणीअभावी कांद्याला अपेक्षित भाव मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी बांगलादेशकडून कांद्यावरील निर्यात बंदी उठविली गेल्याने आशादायक चित्र निर्माण झाले होते. परंतु, तिथेही पूर्ण क्षमतेने कांदा पोहोचू शकला नाही. मालमोटारी बांगलादेशच्या सीमेवर पोहोचल्या. परंतु, मोजकेच परवाने मिळाल्याने संपूर्ण माल बांगलादेशमध्ये गेला नाही. सिमेवर अडकलेला कांदा खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. बांगलादेशकडून परवाने देण्याची प्रक्रिया एक-दोन दिवसांत सुरळीत होण्याची अपेक्षा निर्यातदारांना आहे. लासलगाव बाजारात सध्या २० ते २२ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. मागील सोमवारी क्विटलचे सरासरी १६०० रुपयांवर असणारे दर यावेळी १५५१ रुपयांवर आले. चार्तुमास, दक्षिणेकडील राज्यातील स्थानिक कांदा बाजारात आल्याने नाशिकच्या कांद्याची देशांतर्गत मागणी आधीच घटलेली असताना श्रीलंकेने कांदा व बटाट्यावरील आयात शुल्कात वाढ केल्याचे वृत्त समोर आले. भारतीय फलोत्पादन निर्यातदार संघटनेने त्यास दुजोरा दिला. ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेत स्थानिक कांदा बाजारात येतो. त्यामुळे दरवर्षी त्यांच्याकडून एक ते दीड महिन्यांसाठी आयात शुल्क लावले जाते. तो माल संपुष्टात आल्यावर निर्यात पूर्ववत होते.