Onion Price Hike: बाजारात कांदा भडकला! दीड महिन्यांत किलोमागे ‘इतक्या’ रुपयांनी वाढ; दरवाढ का झाली?
Onion Price Hike: अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातून आवक घटली; दक्षिण भारतातही पावसाने पाठ फिरवल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा.

Onion Price Hike – लांबलेल्या पावसामुळे लांबलेले कांद्याचे पिक, दक्षिण भारतासह देशातील कांदा उत्पादक भागात पावसाने फिरविलेली पाठ, यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. दीड महिन्यांपूर्वी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार १८ ते २५ रुपये भाव मिळणाऱ्या कांद्याला आता ४२ ते ५० रुपये द्यावे लागत असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी राम नरवडे यांनी दिली.
घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात तेजी निर्माण झाली असून, किलोस ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. येथील बाजारात पुणे जिल्ह्यासह श्रींगोदा, पारनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यातून विविध भागातून कांद्याची आवक होते. शुक्रवारी (दि.४) १०० गाड्यांची आवक झाली. दक्षिण भारत ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. तेथे उत्पादनही मोठे होते. मात्र, यंदा तेथेच पावसाने ओढ दिली आहे.
याशिवाय देशातील इतर कांदा उत्पादक भागातही पाऊस नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कवडीमोलाने विक्री होणाऱ्या कांद्याच्या भावात तेजी आली आहे. येत्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भावातील तेजीमुळे शेतकरी समाधानी आहेत. याविषयी आमदाबाद (ता. शिरूर) येथील शेतकरी नितीन थोरात म्हणाले की, कांद्याचे भाव वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत. मागील दोन वर्षांच्या विचार करता तुलनेने अधिक भाव मिळत आहे’
“कांदा उत्पादक क्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे उत्पादन घटणार असून, कांद्याच्या भावात तेजी आली आहे. मागील चार ते पाच वर्षाच्या कालावधीत मिळणारा हा समाधानकारक भाव आहे.”
– राम नरवडे, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड





