Onion Prices Drop – ‘चार महिने जीव तोडून मेहनत करा आणि शेवटी खर्चही निघू नये” अशी संतप्त प्रतिक्रिया शिरुर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसताना यंदा अवकाळी पाऊस, गारपीट आणि बाजारातील घसरण यामुळे कांदा उत्पादक पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी निर्यातबंदी, साठेबाजीविरोधी कारवाई किंवा बाजार हस्तक्षेप यासारखे निर्णय घेतले जातात; मात्र, त्याचा फटका थेट उत्पादक शेतकऱ्यांनाच बसत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट आणि त्यात बाजारातील घसरण, अशा चक्रात अडकलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. सांगा आता जगायचं कसं, याच एका आक्रोशाने हतबल होऊन गेला आहे. मागील वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने तालुक्यात कांदा आणि ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. रब्बी हंगामात हरभरा आणि गहू या पिकांऐवजी अनेक शेतकऱ्यांनी “कांद्यात चांगले पैसे मिळतील” या आशेवर मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. मात्र, त्याच शेतकऱ्यांच्या पदरी प्रचंड निराशा पडली आहे. कांदा बाजारभाव शिरुर तालुक्यात 21 हजार हेक्टरवर लागवड शिरुर तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात साधारण 21 हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी लागवड वाढली होती. परंतु निसर्ग आणि बाजारपेठेतील दोलायमान स्थिती या दोन्ही आघाड्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. खर्च 80 हजारांचा, उत्पन्न तोट्याचा कांदा पिकासाठी रोपे तयार करणे, शेताची मशागत, लागवड, खुरपणी, फवारणी, सिंचन, मजुरी, काढणी, वाहतूक अशा सर्व कामांसाठी एका एकराला जवळपास 80 हजार रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. एकरी 250 ते 300 पिशव्यांपर्यंत उत्पादन मिळाले तरी त्यातही अनेक भागांत गारपिटीने मोठे नुकसान केले. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजला, तर काहींचा साठवणुकीत खराब झाला. परिणामी, शेतकऱ्यांना कांदा तातडीने बाजारात विकावा लागला. सध्या बाजारात कांद्याला केवळ 5 ते 8 रुपये प्रतिकिलो असा कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्नही होत नसल्याने उत्पादन खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे. “कांदा उपादकांना कायमस्वरूपी दिलासा देण अपेक्षित आहे. कांद्याला किलोला 30 रुपये हमीभाव दिला तरच कांदा उपादन घेणे परडवणार आहे. शासनाने कांदा खरेदी करून निर्यातीस चालना दिली पाहिजे. कांद्यावर प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत. कांदा पावडर कांदा पेस्ट, असे पूरक उद्योग शासनाच्या नियंत्रणात उभे केले पाहिजेत.” – संभाजी कांडगे, उपाध्यक्ष, किसान युवा क्रांती संघटना