Pune District | कांद्याची पात, वांग्याचे भरीत अन् बाजरीचा रोडगा

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी गडावर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून -गेली सहा दिवस चालणार्या षडयात्रोत्सवाची शनिवारी (दि. 7) सांगता झाली. सकाळचे सुमारास नित्याची पहाटेची पूजा -अभिषेक भूपाळी आरती झाल्यानंतर समस्त पुजारी, सेवेकरी मानकरी यांचे हस्ते देवांचे घट उठविण्यात आले. श्रीना कांद्याची पात, वांग्याचे भरीत, बाजरीच्या पिठाचा रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
शुक्रवारी (दि. 6) वीर, कोळी, घडशी व पुजारी सेवेकरी यांच्या वतीने गडकोट आवारातून देवांच्या तेल हंड्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. शहरातील गाव चावडीमध्ये खोमणेपाटील, माळवदकरपाटील यांच्यासह अठरा पगड समाजबांधवांचे नावाचा पुकारा होत त्यांच्याकडून तेलहंड्याला मान देण्यात आला त्यानंतर नाईक समाजाच्या वतीने सांगता होत तेलहंडा गडावर नेण्यात येऊन खंडोबा -म्हाळसादेवी यांचा तेलवण व हळदीचा धार्मिक विधी करण्यात आला. (तेलवण व हळदीचा विधी जेजुरीत होतो तर पौष पौर्णिमा यात्रेला मु. पाली (सातारा) येथे देवांचा लग्नसोहळा साजरा केला जातो) शनिवारी पहाटेच्या पूजेनंतर व गडावरील घट उठवल्यानंतर ग्रामवासीयांच्या घराघरातील घट उठविण्यात आले तळीभंडार्, दिवटी पाजळणे, नागदिवे पेटवणे, नैवेद्य, देवांचा जयघोष आदी धार्मिक विधी शहरभर सुरू होते.
राज्यातन अनेक भाविकांनी चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गडकोटावर दाखल होत परंपरेनुसार कुलधर्म कुलाचार करीत देवदर्शन घेतले. गेली सहा दिवस गडकोट आवारात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह देव दीपावली कार्यक्रमांची सांगता झाली जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र मंडळ, पुजारी, सेवेकरी वर्ग व मार्तंड देवसंस्थानच्या वतीने भाविकभक्तांना वांग्याची भाजी, भाकरी, कांद्याची पात, व महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.
चंपाषष्ठी उत्सवाचे महात्म्य
ऋषीगणांच्या तपश्चर्येमुळे भगवान शिवशंकरांनी मणी आणि मल्ल या दैत्यांच्या संहारासाठी खंडेरायाचा अवतार धारण केला. सुर्यासारखे तेजस्वी व उग्र रूप असल्याने मार्तंड भैरव असेही नाव प्रचलित आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत सहा दिवस युद्ध करून दोन्ही दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींनी भंडार्याची उधळण करीत देवांना लाकडी दिवटीन ओवाळले व त्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. चंपाषष्ठी हा खंडेरायाचा अवतार दिन समजला जातो. म्हणूनच पुरातन काळापासून हा उत्सव साजरा केला जातो. बहुतांश घरांमध्ये श्रावण मासानंतर कांदा, वांगे, लसूण खाणे वज्र केले जाते. चंपाषष्ठी उत्सवादिवशी देवांना याचा नैवेद्य अर्पण करून चतुर्मासाचीही सांगता केली जाते.





