Nashik News : धक्कादायक ! मूल होत नसल्याने एमबीए झालेल्या महिलेने उचलले ‘हे’ पाऊल

नाशिक : दोन वेळा गर्भपात तसेच दहा वर्षांपासून बाळ होत नसल्याने एमबीए झालेल्या तसेच शासकीय सेवेत लेखापालपदी निवड झालेल्या महिलेने जिल्हा रुग्णालयात दोन महिने रेकी करत एका परप्रांतीय महिलेचे बाळ चोरले. कुटुंबीयांनाही बाळंत झाल्याचे तिने सांगितले, परंतु भावालाच संशय आल्याने त्यानेच पोलिसांना माहिती दिली. दिशाभूल करणाऱ्या या महिलेला ५ तासांत पाेलिसांनी अटक केली. दिंडोरी येथील कादवानगर येथील घरातून तिला ताब्यात घेत बाळाला आईच्या कुशीत सुखरूप देण्यात आले.
सपना मराठे (३५, रा. दिंडाेरी) असे या चोरी करणाऱ्या संशयित महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सुमन खान (सध्या रा. ठेंगोडा, सटाणा) या महिलेचे ८ दिवसांचे बाळ चोरीला गेले. रात्री ८ वाजता गुन्हा दाखल हाेताच तपासाची चक्रे फिरली. पाेलिसांनी जिल्हा रुग्णालय परिसरापासून सीसीटीव्हीच्या आधारे संशयित महिलेचा त्र्यंबक नाका ते निमाणीपर्यंत ४ किलाेमीटरपर्यंत माग काढत ८६ वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
महिलेचे वर्णन, फाेटाे पाेलिसांनी साेशल मीडियावर व्हायरल केले. चाैकशीअंती संशयित महिला दिंडोरी येथे गेल्याचे आणि ती कादवानगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयित महिलेला अटक करून बाळाला सुखरूप आणून जन्मदात्या आईच्या कुशीत दिले.
‘आई आवाज द्यावा’…
बाळाने ‘आई’ असा आवाज द्यावा… आपल्या अंगाखांद्यावर खेळावे…. आपल्या हाताने त्याला भरवावे अशी तिची इच्छा हाेती. मात्र काही कारणामुळे दाेनदा गर्भपात झाल्यामुळे तिला आई हाेण्याचा आनंद मिळतच नव्हता. मातृत्व प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी बाळ चाेरी केल्याची कबुली या महिलेने दिली.





