One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला 32 पक्षांचा पाठिंबा; 15 पक्षांचा विरोध

नवी दिल्ली –एक देश, एक निवडणुकीच्या प्रस्तावावरून देशभरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. त्या प्रस्तावाला ३२ राजकीय पक्षांचा पाठिंबा, तर १५ पक्षांचा विरोध असल्याचे याआधीच स्पष्ट झाले.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने संबंधित प्रस्तावाची छाननी केली. त्या समितीने राजकीय पक्षांशीही सल्लामसलत केली. एकूण ४७ पक्षांनी त्यांची मतं समितीपुढे मांडली. राष्ट्रीय पक्षांचा विचार करता भाजप आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) या २ पक्षांनी प्रस्तावाचे समर्थन केले.
तर, कॉंग्रेस, आप, बसप आणि माकप या पक्षांनी विरोध दर्शवला. शिंदेसेना, जेडीयू, लोजप (रामविलास), बिजद, अण्णाद्रमुक, शिरोमणी अकाली दल आदी प्रादेशिक पक्षांनी प्रस्ताव मान्य असल्याचे स्पष्ट केले. समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, एमआयएम, भाकप या प्रादेशिक पक्षांनी प्रस्तावाविरोधात मत नोंदवले. अनेक पक्षांनी प्रस्तावाविषयी कुठले मत नोंदवले नाही. एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर आगामी काळात कुठल्या घडामोडी घडणार याविषयी उत्सुकता असेल.





