कर्तव्याची हाक…! मातृभूमीसाठी सुट्ट्या रद्द, एक महिन्याची सुटी; जवान सातव्या दिवशीच पुन्हा सीमेवर

परभणी : भारत आणि पाकिस्तानमध्ये बॉर्डवर असलेल्या तणावामुळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत निघण्याचे आदेश त्यांना दिले गेले आहेत. यामध्ये कोणी सुट्टीवर आलेलं, कोण लग्नासाठी आलेलं होतं, मात्र आता त्यांना लगोलग निघावं लागत आहे.
एक महिन्याची सुट्टी घेऊन मुळगावी आलेल्या व काश्मिरातील राजोरी सेक्टर येथे राष्ट्रीय रायफल मध्ये कार्यरत असलेल्या जवानाला केवळ सातव्या दिवशीच परत कर्तव्यावर परतावे लागले आहे.
राष्ट्रीय रायफलच्या या जवानाचा दैठणा ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी (दि.११) कर्तव्यावर जाताना सत्कार करण्यात आला असून मातृभूमीच्या रक्षणासाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
परभणी तालुक्यातील दैठणा येथील रणजीत हिरामण पवार हा तरुण १४ वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलामध्ये दाखल झाला आहे. लष्कराच्या अनेक महत्त्व पूर्ण कारवायांमध्येही रणजीत पवार याने सहभाग नोंदवलेला आहे. रणजित पवार हा दि. ४ मे रोजी एक महिन्याची सुट्टी घेऊन आपल्या मुळगावी आलेला होता.
भारत पाकिस्तानच्या दरम्यान युध्दाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुट्टीवर आलेल्या जवानांना तात्काळ कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आलेले होते. यातच सुट्टीवर आलेले सैनिकही राष्ट्र प्रथम या भावनेने मातृभूमीची सेवा करण्यासाठी तत्परतेने निघालेले आहेत.
लग्नाची हळद अंगावरच, मोठा भाऊ सीमेवर रवाना
सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी गावचे प्रज्वल हिंमत रुपनूर २०२०ला मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले. प्रज्वल हे लग्नासाठी दीड महिन्याची सुट्टी घेऊन आले होते. प्रज्वल यांचा १४ एप्रिल रोजी तृप्ती दुधाळ यांच्याशी विवाह झाला. दरम्यान ऑपरेशन सिंदुरचा मेसेज आल्यानंतर सुट्टी रद्द करून लगेच ते भुज येथे हजर राहण्यासाठी रवाना झाले.
घरातून निघताना रुपनूर कुटुंबीयांनी जवान प्रज्वल रुपनूर यांचं औक्षण केलं. रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या प्रज्वल यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.





