Satara : लग्नाची हळद ओली असतानाच जवान देशसेवेसाठी!

पुसेगाव : काळेवाडी (ता. खटाव) येथील जवान प्रसाद भरत काळे आपल्या लग्नासाठी एक महिन्याची सुट्टी काढून गावी आला होता. चि. सौ. कां. वैष्णवी हिच्याशी तो दि. 1 मे रोजी विवाह बंधनात अडकला. यादरम्यान देशात युध्द परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय सेनेने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून तातडीने ड्युटीवर उपस्थित राहण्याचा संदेश सर्वांना फोनद्वारे देण्यात आला. लग्नाची पूजा सुरु असताना जवान प्रसाद काळे यालाही युनिटमधून तातडीने हजर राहण्याचा संदेश आला. कोणताही विचार न करता अंगावर ओली हळद असतानाच पूजेच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचा निरोप घेऊन तो देशाच्या संरक्षणासाठी देशसेवेसाठी रवाना झाला.
युध्दाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वत्र हायअलर्ट देत सर्तकतेच्या सूचना देण्यात येत आहेत. भारतीय सेनेनेही सुट्टीवर गेलेल्या सर्व जवानांना ड्युटीवर माघारी बोलवले आहे. लग्नानंतर नववधू सोबत फिरायला जाणे, मौजमस्ती करणे, कुटुंबात एकत्र राहणे ही स्वप्ने रंगवत सुट्टीवर आलेल्या प्रसाद काळे यांना तातडीने ड्युटीवर जावे लागल्याने त्याची स्वप्ने प्रलंबित पडली. नववधूला आपल्या कुटुंबासमवेत ठेवून तो देशसेवेसाठी निघून गेला.
जवानांना मिळणाऱ्या वर्षातील सुट्ट्या थोडक्या असल्या तरी त्यात जवान समाधान मानतात. सुट्टीवर आले की कुटुंबाला वेळ देण्याबरोबरच पै पाहुणे, मित्रमंडळी यांच्या गाठीभेटीत त्यांची सुट्टी कधी संपते ते त्यांनाही समजत नाहीत. परंतु, भावनिक नात्यात न गुंतता पुन्हा देशसेवेसाठी जाण्यासाठी ते तयार असतात. आपल्या मुलाच लग्न झालं की त्याला लगेच ड्युटीवर जाव लागल याचं दु:ख आईवडीलांना असणं साहजिक आहे. सर्वांना अनोळखी असणारी नववधू आपले माहेरचं घर सोडून सासरी आली खरी. आपला जोडीदार देशसेवेसाठी निघून गेल्यानंतर तिची अवस्था लक्षात घेतली तरी मोठ्या मनाने तिने जोडीदाराला आनंदाने निरोप दिला. त्यामुळे या नवदाम्पत्यांचे कौतुक केले जात आहे.
देशसेवेसाठी माझं कुंकू पाठवतेय…
आमचं नुकतंच लग्न झाले. पूजेच्या दुसऱ्यादिवशी ते ड्युटीवर जाणार असल्याचं समजल्यावर थोडं वाईट वाटलं. पण देशाची सेवा करण्यासाठी ते जात आहेत याचा मला अभिमान आहे. म्हणून मोठ्या आनंदाने मी देशसेवेसाठी माझं कुंकू पाठवलय.
– वैष्णवी काळे (नववधू, काळेवाडी)आपली सुट्टी रद्द करण्यात आली असून तातडीने युनिटमध्ये हजर राहा, असा फोन लग्नानंतर पूजेदिवशी आला. याची कल्पना मी कुटुंबाला देताच सर्वांचा चेहरा पडला.तरीही सर्वांनी मला दुसऱ्या दिवशी आनंदाने निरोप दिला. त्यामुळे पूजेच्या दुसऱ्यादिवशी मी देशसेवेसाठी रवाना झालो आहे.
– प्रसाद काळे (जवान, काळेवाडी)





