बँकॉक – थायलंडने आज कंबोडियाच्या १८ सैनिकांची सुटका केली. गेल्या पाच महिन्यांपासून हे सैनिक थायलंडच्या ताब्यात होते. थायलंड आणि कंबोडियामध्ये झालेल्या युद्धबंदी करारातल्या तरतूदीनुसार हा करार ७२ तास पाळला गेल्यानंतर थायलंडने या सैनिकांची सुटका करणे अपेक्षित होते. त्यानुसार आज या सैनिकांची सुटका करण्यात आली. थायलंड आणि कंबोडियाच्या संरक्षण मंत्र्यांनी शनिवारी युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. थायलंडचा चंथाबुरी प्रांत आणि कंबोडियाचा पैलिन प्रांतादरम्यानच्या सीमेवरील चौकीवरच या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्याच सीमेवर कंबोडियाच्या सैनिकांना सोडून देण्यात आले. कंबोडियाच्या १८ सैनिकांचे मायदेशी परतणे हे सद्भावना आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे तसेच आंतरराष्ट्रीय मानवतावादी तत्त्वांचे पालन दर्शवण्यासाठी करण्यात आले, असे थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या भूभागावर दोन्ही देशांकडून दावा केला जात असल्याने झालेल्या सशस्त्र संघर्षानंतर संघर्ष थांबवण्यासाठी चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर हा युद्धबंदी करार करण्यात आला. कालच चीनच्या मध्यस्थीनंतर हा युद्धबंदी करार अधिक स्थायी आणि समर्थ करण्यास दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी सहमती दर्शवली आहे.