Pune : ज्येष्ठ नागरिक, सैनिक यांना अधिकाऱ्यांना भेटण्याची मुभा

पुणे : राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना भेटीसाठीची वेळ निश्चित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सह जिल्हा निबंधक या कार्यालयामध्ये नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार ते शुक्रवार दुपारी तीन ते पाच अशी वेळ निश्चित केली आहे. मात्र, दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि संरक्षण सेवेतील नागरिकांना मात्र वेळेची मर्यादा लागू नाही. या व्यक्ती सोमवार ते शुक्रवार कोणत्याही वेळेत सह जिल्हा निबंधक यांना भेटू शकतात.
मुख्यमंत्री यांनी निश्चित केलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी दैनंदिन वेळ राखून ठेवावी. तसे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
याविषयी माहिती देताना हिंगाणे यांनी सांगितले की, सकाळ सत्रातील दुय्यम निबंधक कार्यालय तसेच नियमित वेळेतील कार्यालयात आणि विवाह अधिकारी पुणे यांना भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दुपारी ०२.०० ते ०३.०० ही वेळ निश्चित करण्यात येत आहे. तसेच, दुपार सत्रातील दुय्यम निबंधक हवेली क्र.११, १७ व २२ यांना भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दुपारी ४.३० अते ५.०० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
तर दुय्यम निबंधक हवेली क्र.०१ ते ०९ कार्यालयतील जुन्या दस्तांच्या बाबतीत भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० हि वेळ निश्चित करण्यात आली आहे.





