केजरीवाल-ठाकरे भेटीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “मी उद्धव ठाकरेंना जवळून पाहिलं, त्यांचं खरं ओळखतो…’

मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे.
त्याउलट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय धक्कादायक आहे. स्थापनेपासून शिवसेना म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. मात्र, यापुढे शिवसेना हा शिंदेंचा पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळेच शिवसेनेचे महत्त्वाचे निर्णय जिथे घेतले जातात त्या मातोश्री बंगल्यावरील मुख्य बैठकीच्या ठिकाणचे धनुष्यबाण हे चिन्ह देखील आता काढून टाकण्यात आलं आहे.
नुकतंच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ‘उद्धव ठाकरे हे वाघाचा मुलगा आहेत, ते लढाई जिंकतील’, असं केजरीवाल यावेळी म्हणाले. दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री आहे… सगळ्या गोष्टींची खबर ठेवतो. आम्ही उद्धव ठाकरेंना जवळून पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना आम्हीच खरं ओळखतो.. माझा स्वभाव हा काम करण्याचा आहे. तसेच, निवडणूक आयोगाने निर्णय दिला, त्याचं स्वागत करतो. न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग ह्या स्वायत्त संस्था आहे.
आपल्या बाजूने निर्णय लागला की या संस्था चांगल्या आणि आपल्या विरोधात निर्णय लागला की संस्था वाईट, असं काहीजण वागत आहेत. आम्ही फक्त शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह घेतलं आहे. त्यांच्या संपत्तीवर आम्ही दावा केलेला नाही. आमच्यासाठी बाळासाहेबांचे विचार ही प्रॉपर्टी आहे.. विरोधकांनी केलेल्या आरोपांना मी माझ्या कामातून उत्तर देईल’. असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.





