Tokyo Olympic | दिग्गज टेनिसपटूंचा ऑलिम्पिक सहभाग अनिश्चित

टोकियो – जपानमध्ये पुढील महिन्यात होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील टेनिस स्पर्धेत जागतिक स्तरावरील दिग्गज खेळाडू सहभागी होणार का, याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. काही खेळाडूंनी माघार घेतली असून, अनेक खेळाडूंनी अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही.
क्ले कोर्टचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेनच्या टेनिसपटू राफेल नदालने ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेनंतर ऑलिम्पिक स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी जास्त वेळ नसल्याने तंदुरुस्त नसल्याचे कारण देत नदालने माघार घेतली आहे.
जगातील चौथ्या क्रमांकाचा टेनिसपटू असणाऱ्या ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमनेही ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. आपण या स्पर्धेसाठी तयार नसून सध्या विम्बलडन स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे डॉमिनिकने सांगितले आहे.
कॅनडाचा टेनिस स्टार डेनिस शापोवालोवने करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
नोवाक जोकोविचने अद्याप कोणताही निर्णय सांगितलेला नाही. मात्र, सामन्यासाठी प्रेक्षक उपस्थित राहणार असतील तरच खेळणार असल्याचे त्याने सांगितले. जोकोविचने नुकतीच फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली.
मात्र, तरीही ऑलिम्पिकमधील सहभागाबाबत स्पष्ट मत व्यक्त केलेले नाही. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने तंदुरुस्तीच्या कारणामुळे फ्रेंच ओपन स्पर्धेतून उपांत्य फेरीत प्रवेश केलेला असतानाही माघार घेतली होती. आता ऑलिम्पिकमध्ये खेळण्याबाबत काहीही निर्णय घेतलेला नसल्याचेही सांगितले आहे.





