Rahul Gandhi : “संसद, विधानसभांत महिलांची अधिक भागीदारी आवश्यक”; राहुल गांधी यांची भूमिका

Rahul Gandhi – महिला नेहमीच आपल्या समाजातील आणि राजकारणातील महत्वपूर्ण शक्ती ठरल्या आहेत. तसे असूनही संसद आणि विधानसभांमध्ये नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये असमानता कायम आहे.
खऱ्या समानतेसाठी त्या सभागृहांमध्ये अधिकाधिक महिलांची भागीदारी आवश्यक आहे, अशी भूमिका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी मांडली.
राजकारणात महिलांना समान संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशातून कॉंग्रेसने शक्ती अभियान हाती घेतले आहे. त्या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन राहुल यांनी सोशल मीडियावरून महिलांना केले. अर्ध्या लोकसंख्येला (महिला) पूर्ण हक्क मिळवून देण्याच्या उद्दिष्टाप्रती आम्ही समर्पित आहोत.
परिवर्तन घडवण्यासाठी तयार असणाऱ्या महिलांनी अभियानात सहभागी व्हावे. महिलांची भागीदारी जमिनी स्तरावर संघटनेला मजबूत बनवून खरे परिवर्तन घडवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शक्ती अभियानासाठी युवक कॉंग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्या माध्यमातून अधिकाधिक तरूणींना कॉंग्रेसचा घटक बनवण्याचे प्रयत्न आहेत. त्यामागे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि संसदेत महिलांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा उद्देश आहे.





