– विजय लाड / कोयनानगर मुंबई – महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून ‘पर्यटन दृष्टी 2047 नवी दिशा, नव्या संधी!’ हा उपक्रम महाराष्ट्रात सुरू झाला असून, राज्याच्या पर्यटन विकासाचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासाठी जनतेचा थेट सहभाग घेतला जात आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ राज्यभरातून नागरिकांचे अनुभव, अपेक्षा आणि कल्पना गोळा करत आहे. हा उपक्रम केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरता मर्यादित नसून, तो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील पर्यटनाविषयीची स्वप्नं आणि भावना जाणून घेण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. कोकणातील निळसर किनारे, सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट, वारसास्थळं, धार्मिक केंद्रे, ग्रामीण आणि साहसी पर्यटनाच्या वाटा या साऱ्या पैलूंचा समावेश या संकल्पनेत केला जात आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “आजचा पर्यटक हा अनुभव शोधतोय. प्रवास करताना तो स्थळांबरोबरच संस्कृती, लोकजीवन आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवत असतो. महाराष्ट्र ही अनुभवांची प्रयोगशाळा बनवण्याचं उद्दिष्ट या मोहिमेमागे आहे.” राज्यभरातून सुरू असलेल्या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत खालील मुद्द्यांवर नोंदवायचे आहे. पर्यटन स्थळांचा सध्याचा अनुभव, उपलब्ध सुविधा आणि येणाऱ्या अडचणी, स्थानिकांचे आतिथ्य, माहिती मिळवण्याची सुलभता, आणि सुरक्षिततेबाबतचा विश्वास. याशिवाय भविष्यातील दृष्टीकोन स्पष्ट करताना शाश्वत पर्यटन, डिजिटल अनुभव (जसे AI गाईड्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी टूर), सांस्कृतिक वारसा, वैद्यकीय पर्यटन, साहसी आणि तरुणांसाठी उपयुक्त मॉडेल्स यावरही भर दिला जात आहे. या उपक्रमात पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटने, तसेच MTDC चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांचा समन्वय आहे. MTDC चे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी (भाप्रसे) यांनी सांगितले की, “हे सर्वेक्षण म्हणजे एक नवा आरसा आहे. ज्यात महाराष्ट्राच्या पर्यटन भविष्याचं प्रतिबिंब दिसेल. हा आराखडा लोकसहभाग, नवकल्पना आणि पर्यावरणीय जाणीव यांवर आधारित असेल.” राज्य शासनाच्या पुढाकाराने, हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवला जात आहे आणि पर्यटक, स्थानिक नागरिक, उद्योजक, तरुणवर्ग अशा सर्व घटकांकडून मते गोळा केली जात आहेत. 2047 च्या पर्यटन महाराष्ट्रासाठी आजचा नागरिक हा भागीदार ठरत असून, शासनाने उचललेलं हे पाऊल म्हणजे लोकशाहीतून चालणाऱ्या पर्यटन धोरणाचं एक उत्तम उदाहरण आहे.