Pune News : खडकी शिक्षण संस्थेचा “शांतता पुणेकर वाचत आहेत” उपक्रमात सक्रिय सहभाग

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयात 14 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित पुस्तक महोत्सवात खडकी शिक्षण संस्थेने “शांतता पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमाच्या माध्यमातून मोठा सहभाग नोंदवला आहे. संस्थाध्यक्ष कृष्ण कुमार गोयल, प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला.
या वेळी संस्थाध्यक्ष गोयल यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “पुस्तकाचा ध्यास म्हणजे जीवनाचा विकास आहे. विद्यार्थ्यांसह प्रत्येक नागरिकाने वाचनाचा छंद जोपासून आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली पाहिजे.”
खडकी शिक्षण संस्थेचे प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे यांनी या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित पुस्तक महोत्सवाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांना महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.
हा उपक्रम पुस्तकप्रेमींसाठी एक पर्वणी असून, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला आहे. या माध्यमातून खडकी शिक्षण संस्थेने वाचनप्रेम वाढविण्यासाठी घेतलेले पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरतील.





