Pune : उत्कर्ष सामाजिक सांस्कृतिक महोत्सव

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दि. २३ ते २५ फेब्रुवारी रोजी तीन दिवसांच्या राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील १६ विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे संघ या स्पर्धेत आपल्या विविध कलागुणांचा आविष्कार सादर करणार आहेत.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे १५ वे वर्ष असून, त्याच्या आयोजनाचा बहुमान पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. नीलेश पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली.
उत्कर्ष उपक्रमांतर्गत नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य आणि ललित कला यांसह पथसंचलन आणि कार्यप्रसिद्धी अहवाल या विभागांमधून एकूण १३ कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांच्या सादरीकरणाची संधी मिळणार आहे.
विद्यापीठामध्ये संत ज्ञानेश्वर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, संत नामदेव सभागृह, इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुल सभागृह आणि पोतदार संकुल या ठिकाणी विविध कला प्रकारांच्या सादरीकरणासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २५ फेब्रुवारीला होणार आहे.





