बाणेर टेकडीवर ‘ओकिनाविसियस टेकडी’

पुणे – एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या संशोधकांनी उडी मारणाऱ्या कोळीच्या नवीन प्रजाती ओकिनाविसियस टेकडी चा शोध बाणेर टेकडीवर लावला आहे. याचा शोध टेकडीवर लागल्यामुळे या कोळीच्या नावात टेकडी हा शब्द टाकण्यात आला असल्याचे संशोधकांनी म्हंटले आहे.
या संशोधनाने पुण्याच्या जैवविविधतेच्या संपत्तीला नव्याने अधोरेखित केले आहे. बाणेर टेकडीवरील गरुडकर जैव विविधता उद्यानात हा कोळी आढळला आहे. मागील कित्येक वर्षांपासून गरुडकर उद्यानात मोठ्या प्रमाणात टेकडी संवर्धनाचे काम होत आहे.
ओकिनाविसियस टेकडी या प्रजातीचे पहिले वर्णन एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे येथील पर्यावरणशास्त्रातील एम.एस्सी.चा विद्यार्थी अथर्व कुलकर्णी आणि केरळमधील ख्राईस्ट कॉलेजच्या ऋषिकेश त्रिपाठी यांनी केले. त्यांना डॉ. पंकज कोपर्डे (एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे) आणि डॉ. ए.व्ही. सुधिकुमार (ख्राईस्ट कॉलेज, केरळ) यांनी मार्गदर्शन केले.
कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने बाणेर हिलवरील फायकस आणि प्लुमेरिया या झाडांवर या कोळीचा अभ्यास केला आणि काही महिन्यांनंतर त्याला नवीन प्रजाती म्हणून मान्यता दिली. आर्की मोनाली शाह यांनी संशोधनादरम्यान सहाय्य केले.
बाणेर हिल आणि पुण्यातील इतर टेकड्या त्यांच्या नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्वामुळे प्रसिद्ध आहेत. हा नवा सापडलेला कोळी जागरूकता वाढवून या परिसंस्थांसाठी संवर्धन उपक्रमांना चालना देऊ शकेल.
“कोळीची ही प्रजाती ओ. टाकरेंसिस प्रजातीजवळ आहे. परंतु, यामध्ये विशेष आकारात्मक फरक आहे. हे कोळी जाड फांद्या आणि घनदाट पानांवरील झाडांवर, विशेषतः प्लुमेरिया म्हणजे चाफा, फायकस म्हणजे वड, पिंपळ आणि महुआ अशा झाडांवर आढळले. राम-मुळा संगम क्षेत्रात याच प्रजातीला अलीकडे शोधले असून त्याच्यासाठी योग्य पर्यावरणीय व्यवस्था आहे.” – अथर्व कुलकर्णी, संशोधक विद्यार्थी, पर्यावरणशास्त्र
“ओकिनाविसियस टेकडी ही प्रजाती बाणेर टेकडी आणि पुण्यातील इतर तत्सम जागांसाठी एक प्रतीक होऊ शकते. या शोधामुळे लोक शहरी टेकड्यांकडे आणि जंगलांकडे जबाबदारीच्या भावनेने पाहतील. या शोधातून शहरी जैवविविधतेविषयी मनुष्य अजून किती अज्ञात आहे यावर प्रकाश पडतो आहे.” – डॉ. कोपर्डे, संशोधन निरीक्षक





