‘अहो… उठा ना? सकाळचे दहा वाजत आले आहेत. रात्रभर सर्दी खोकल्यामुळे झोपला नाहीत. कितीवेळा सांगितलं नुसतं गोळ्या आणि कफ सायरप यांचा काही उपयोग होणार नाही म्हणून. आज मी तुमचं काहीएक ऐकणार नाही. तीन दिवस झाले डॉक्टरकडे जायची नुसती टाळाटाळ करताय. ते काही नाही मी डॉक्टरांची साडेअकराची अपॉइंटमेंट घेतलीय. एम.डी. आहेत आणि त्यांचं क्लिनिक आपल्या घरापासून जवळच आहे. उठा आणि लवकर तयार व्हा.’ विक्स इनहेलर बंद नाकाला लावत मी नाईलाजाने उठलो. तसा खोकला थोडा कमी झाला होता पण काल मित्राच्या घरी वहिनीनी आग्रहानं दिलेलं श्रीखंड खाल्लं आणि तिथंच घात झाला. अर्थात हे मी बायकोला सांगितलं नव्हतंच. तसा डॉक्टर वा हॉस्पिटल या विषयाशी पेशंट असलेल्या एखाद्या नातेवाईकांना भेटायला जाण्याव्यतिरिक्त आयुष्यात माझा फारसा संबंध आला नाही. त्यामुळं मला डॉक्टरकडे जायचा उत्साह नव्हताच. बरोबर साडेआकराला मी क्लिनिकला पोहचलो आणि समोर असलेला लॅपटॉप आणि हातातील मोबाइलवरचं स्टेटस एकाचवेळी कौशल्यानं बघत असलेल्या रिसेप्शनिस्ट कम सिस्टरला भेटलो ‘मॅडम, साडेअकराची माझी अपॉइंटमेंट होती.’ मी नाव सांगितलं. तिनं समोर असलेलं रजिस्टर चेक केलं आणि म्हणाली, ‘कन्सल्टेशन चार्जेस पाचशे रुपये होतात. कॅश देताय की ऑनलाइन?’ आपल्या मोबाइलवरची नजर न काढताच ती मला म्हणाली. मी खिशातून पाचशे काढून तिच्यासमोर ठेवले. तिनं नाईलाजानं मोबाइल बाजूला ठेवला आणि केबीनमध्ये बसलेल्या डॉक्टरांशी फोनवर बोलून मला म्हणाली, ‘सर, डॉक्टर बिझी आहेत, अजून एक तास लागेल. तुम्ही शेजारच्या वेटींग रूममध्ये बसा. मी नंबर आला की सांगते.’ तिनं पुन्हा आपला मोर्चा आपल्या मोबाइलवरच्या स्टेटसकडे वळवला. तिची ही ड्युएल सर्व्हिस बघून मी वैतागलो होतो. ‘अहो पण मॅडम तुम्ही साडेअकराची अपॉइंटमेंट दिलीय. मी माझी दुसरी काम टाकून आलोय. अजून एक तास लागणार असेल तर मग तुमच्या अपॉइंटमेंटला काय अर्थ आहे?’ ‘डॉक्टरांना भेटायला अचानक त्यांचा यूएसचा फ्रेंड आलाय.’ रिसेप्शनिस्टनं निर्विकारपणे सांगितलं. कन्सल्टींगचे पाचशे रुपये आधीच दिले असल्यामुळे मला वेटींग रूमकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हताच. वेटींग रूम बर्यापैकी मोठी होती. तिथे दोन भिंतीला लागून दोन सिंगल कॉट आणि एका भिंतीला लागून एका लाकडी बाकड्यावर सलायन लावलेले तीन पेशंट ‘लागले नेत्र पैलतिरी’ अशा भावात आकाशाकडे डोळे लावून पडले होते. आणि डोअरला लागून असलेल्या सोफ्यावर माझ्यासारखे तीन चार ‘वेटींग पेशंट’ दाटीवाटीनी बसले होते. तथाकथित वेटींग रूममधलं ते गंभीर वातावरण बघून मला अस्वस्थ वाटायला लागलं. एवढ्यात सलायन लावलेल्या एका पेशंटला दोन तीन शिंका आल्या आणि काही कारण नसताना आपल्यालाही एखादा सीरियस आजार नाही ना असं उगीचच मला वाटायला लागलं. तशा वातावरणात बसण्यापेक्षा पोर्चमध्ये थांबलेलं बरं असा सुज्ञ विचार करून मी घाईघाईने बाहेर आलो. अर्ध्या एक तासानंतर माझा नंबर आला आणि मी डॉक्टरांच्या केबीनमध्ये शिरलो. डॉक्टरांनी माझा मेडिकल डाटा सेव्ह केला (हल्लीच्या डॉक्टरांना स्टेथास्कोपची फारशी गरज पडत नाही) आणि थंडपणे मला म्हणाले, ‘बोला आता… काय होतंय?’ ‘तसा चार पाच दिवस झाले सर्दी खोकला आहे; पण कालपासून खूपच वाढलाय.’ मी किरकोळ आजार आहे अशा टोनमध्ये सांगितलं. ‘चार पाच दिवस झाले आणि तुम्ही आज येताय?’ एवढ्यात मागच्या तासभर मला न आलेली खोकल्याची उबळ नेमकी त्यांच्यासमोरच आली. ‘ओह इटस् सीरियस. तुमचा खोकला गंभीर दिसतोय. थंडी, थकवा पण जाणवतोय का?’ ‘तसं काही नाही पण रात्रभर खोकल्यामुळे झोप झाली नाही त्यामुळे सकाळी थकल्यासारखं वाटलं होतं. पण आता ओके आहे.’ मी माझं वैद्यकीय ज्ञान (की अज्ञान?) प्रकट केलं. ‘अहो झोप झाली नाही तर सुस्ती येते, थकवा नाही आणि तुम्हाला माहीत आहे ना हल्ली पुण्यात न्यूमोनियानं किती थैमान घातलं आहे ते?’ (कालच्याच न्यूजपेपरमध्ये ‘ससूनमध्ये पुण्याच्या कोंढवा परिसरातील दोन पेशंट दगावले तरी त्या भागातील जनतेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी’ अशी बातमी मी वाचली होती आणि डॉक्टर मला न्यूमोनियानं पुण्यात ‘थैमान’ घातलंय असं सांगत होते) मला आता उगीचच माझा आजार ‘क्रिटिकल’ आहे असं वाटायला लागलं होतं. ‘सर्दी जास्त नाही पण तुमचा खोकला मला इन डेप्थ चेक करावा लागणार आहे. वर सेकंड फ्लोअरला माझ्या भाच्याचं स्कॅनिंग सेंटर आहे. त्याच्याकडे जाऊन लगेच चेस्टचं सी.टी. स्कॅन करून घ्या. तो चारपाच हजारांत, रिजनेबल रेटमध्ये करून देईल. मी चिठ्ठी देतोच आहे. शेजारी लागूनच माझ्या मिसेसची पॅथॉलॉजीकल लॅब आणि डायग्नॉस्टीक सेंटर आहे. मी तिला फोन करतोय. बी.पी. चेक करून घ्या तसेच तुमचा सीबीसी टेस्ट रिपोर्ट पण लागेल. (सीबीसी म्हणजे रक्ताच्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या याचं ज्ञान मला नंतर झालं) सगळे रिपोर्ट माझ्याकडे संध्याकाळपर्यंत येतील. तुम्ही रात्री आठ वाजता या. रिपोर्ट बघूनच तुमच्या आजाराचं नक्की निदान मला करता येईल. लगेच जा. नो टाइम वेस्ट.’ डॉक्टरांचा चेहरा गंभीर दिसत होता. खोकल्याची आलेली मोठी उबळ आतल्या आत दाबून धरत मी डॉक्टरांसमोरून उठलो आणि एखाद्या सहा महिन्यांच्या आजारी माणसासारखा हळूहळू चालत बाहेर आलो. रिसेप्शनिस्टच्या समोरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली. तसाच उठून ‘पलिकडच्या’ पॅथालॉजीकल लॅबकडे गेलो. इथही मॅडमनी सगळ्या टेस्टचे विथ डिस्काउंट चार हजार पाचशे रुपये अॅडव्हान्स घेतले आणि टेस्ट रिपोर्ट संध्याकाळपर्यंत डॉक्टरांना आणि मला ऑनलाइन मिळतील असं सांगितलं. सेकंड फ्लोअरच्या ‘भाच्या’कडे जाऊन चार हजार रुपयाच्या ‘रिजनेबल’ चार्जेसमध्ये चेस्टचं सी.टी.स्कॅन केलं.तसा रात्रीच्या मानानं खोकला खूपच कमी झाला होता पण न्यूमोनियाची भीती आणि वाढत्या बिलाची धास्ती याच्या टेंशनमध्ये आठ कधी वाजले ते समजलंच नाही. बरोबर आठ वाजता मी क्लिनिकला पोहोचलो. डॉक्टर साडेआठला येतील असं रिसेप्शनिस्ट कम सिस्टरनं दुपारसारखचं निर्विकारपणे सांगितलं. (म्हणजे पुन्हा वेटींग पेशंट!) एकतर सकाळपासून नऊ दहा हजार रुपये गेले होते आणि अजून कशाचाच काही पत्ता नव्हता त्यामुळे मी जास्तच वैतागलो होतो. डॉक्टर पावणेनऊला आले आणि त्यांनी बोलवायच्या आतच मी केबीनमध्ये शिरलो. ‘अभिनंदन!’ डॉक्टर माझा हात हातात घेत म्हणाले, ‘तुम्हालाच बोलावणार होतो. तुमचे सगळे रिपोर्टस पाच वाजताच आले आणि मी चेक केलेत. गुड न्यूज! तुमचे सगळे रिपोर्टस नॉर्मल आले आहेत. नो न्यूमोनिया. इटस् व्हायरल इंनफेक्शन. (हल्ली ‘व्हायरल’ हा सगळ्या डॉक्टरांचा परवलीचा शब्द झालाय) मी आठ दिवसांच्या गोळ्या आणि औषध लिहून देतो. तुमचा खोकला कमी होऊन जाईल. ओके?’ मला काय बोलावं ते समजेना. कसाबसा मी डॉक्टरांच्या हातातून माझा हात सोडवून घेतला आणि त्यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन घेऊन बाहेर आलो. एकदाची सुटका झाली अशा रिलॅक्स मुडमध्ये मी घाईघाईने निघालो एवढ्यात रिसेप्शनिस्टनं हाक मारली. ‘सर… आत्ताच्या अपॉइंटमेंटचे पाचशे रुपये राहिले आहेत.’ मी एकदा तिच्याकडे तिरकसपणे पाहिलं आणि खिशात हात घालून बोटानी खिशाचं ‘सी.टी. स्कॅन’ केलं. खिशात बरोबर पाचशे रुपयांची एक नोट तेवढी बाकी राहिली होती. खोकला आला की कुणीतरी आठवण काढली असं म्हणतात. पण मला आता खोकला आणि डॉक्टरांची आठवण दोन्हीही नकोय. – कृष्णकेशव देशमुख