द.आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

टी-२० मालिकेत हरवल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने दक्षिण आफ्रिकेचा मोठा पराभव केला. ११ ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ७ गडी राखून पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघाने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. मालिका विजयाच्या आनंदात कर्णधार शिखर धवनसह युवा खेळाडूंनी डान्स करून जल्लोष केला.
एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबादारी शिखर धवनकडे देण्यात आली होती. संघाने या मालिकेत दमदार कामगीरी करत आफ्रिकन संघाला धूळ चारली. मालिका जिंकल्यानंतर खेळाडूंच्या जल्लोषाचा एक व्हिडिओ धवनने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट केला आहे. यामध्ये संघातील बहुतांश खेळाडू नाचताना दिसत आहेत. प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांच्या ‘बोलो ता रा रा रा’ या गाण्यावर खेळाडूंनी डान्सचा आनंद लुटला.
मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १०० धावांत तंबूत परतला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १९. १ षटकात तीन गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने ४ बळी घेतले. यासोबतच भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
View this post on Instagram
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला त्याच्या या वनडे मालिकेतील दमदार कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार’ देण्यात आला. सिराजने भारताच्या मालिका विजयात महत्वाची भूमिका बजावत ३ सामने खेळत ५ बळी घेतले.





