Varun Aaron Retirement : भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण अरुणने ( Varun Aaron ) प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या 34 व्या वर्षी वरुण अरुण झारखंडकडून राजस्थान विरुद्ध शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. वरुण अरुणने 2008 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत वरुण अरुणने 65 सामने खेळले आणि 168 विकेट्स घेण्यात यश मिळवले.
वरुण अरुणचा गोलंदाजीचा वेग पाहून त्याला टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली. तथापि, वरुणची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकली नाही आणि तो भारतासाठी केवळ 9 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळू शकला.
वरुण अरुणला 2011 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. 2015 पर्यंत वरुण अरुण टीम इंडियामधून आत-बाहेर होत राहिला. वरुण अरुण 2015 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वरुणने 9 कसोटी सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. 2011 मध्ये वनडे कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर वरुण अरुणने 2014 पर्यंत 9 वनडे खेळले आणि 11 विकेट घेतल्या.
IND vs ENG 3rd Test Day 2 : राजकोटमध्ये फिरकीपटू ‘रवी अश्विन’ने रचला मोठा इतिहास…
वारंवार दुखापतींमुळे वरुण अरुणच्या क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम झाला. ( Varun Aaron To Quit Red Ball Cricket ) निवृत्तीची घोषणा करताना वरुण अरुण म्हणाला, “मी 2008 पासून लाल चेंडूचे क्रिकेट खेळत आहे. मी नेहमीच वेगवान गोलंदाजी केली आहे. यामुळे मी पुन्हा पुन्हा दुखापतग्रस्त झालो. आता माझे शरीर मला साथ देत नाही. मला फार वेगवान चेंडू टाकता येत नाही. त्यामुळेच मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.”
वरुण अरुण झारखंडसाठी जमशेदपूरमध्ये शेवटचा सामना खेळत आहे. याच मैदानातून वरुण अरुणने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. तथापि, वरुण अरुण त्याच्या छोट्या कारकिर्दीत त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत राहण्यात यशस्वी झाला.
ब्रॉडचे तुटले होते नाक…
2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना वरुण अरुणच्या बाऊन्सरने इंग्लंडचा स्टार क्रिकेटर स्टुअर्ट ब्रॉडचे नाक तुटले होते. वरुण अरुण हा असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे सतत 150 किलोमीटर वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता होती.