NZ vs SA : केन विल्यमसनने रचला इतिहास! न्यूझीलंडसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Champions Trophy 2025 Semi Final NZ vs SA : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात, न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावत इतिहास रचला आहे. केन विल्यमसन न्यूझीलंड संघासाठी १९ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय केनने इतरही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या स्पर्धेत केनची बॅट आग ओकत आहे.
लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डावातील २७ वी धाव पूर्ण करताच त्याने मोठी कामगिरी केली. विल्यमसनने २०१० मध्ये न्यूझीलंडकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याने ३७० सामने खेळले आहेत. या काळात त्याच्या बॅटने ४४० डावांमध्ये १९०७५ धावा केल्या आहेत. विल्यमसनच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ४८ शतके आणि १०२ अर्धशतके आहेत.
केन विल्यमसनने रचला इतिहास –
केन विल्यमसननंतर, माजी क्रिकेटपटू रॉस टेलर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. टेलरने २००६ ते २०२२ दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलंडसाठी एकूण ४५० सामने खेळले. दरम्यान, त्याने ५१० डावांमध्ये ४२.७२ च्या सरासरीने १८१९९ धावा केल्या. टेलरने आंतरराष्ट्रीय स्तरावर ४० शतके आणि ९३ अर्धशतके झळकावली आहेत.
All class 👌
Kane Williamson steps up with a 💯 as New Zealand keep adding the runs in Lahore 💥#ChampionsTrophy #SAvNZ ✍️: https://t.co/dGzPWxoavO pic.twitter.com/hGywiN5XSb
— ICC (@ICC) March 5, 2025
आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज :
- १९०७५ धावा – केन विल्यमसन
- १८१९९ धावा – रॉस टेलर
- १५२८९ धावा – स्टीफन फ्लेमिंग
- १४६७६ धावा – ब्रेंडन मॅक्युलम
- १३४६३ धावा – मार्टिन गुप्टिल
केव विल्यमसनचे १५ वे एकदिवसीय शतक –
या सामन्यात केन विल्यमसन शतक झळकावल्यानंतर बाद झाला आणि त्याच्या रुपाने न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. विल्यमसन शानदार फलंदाजी करत होता आणि त्याने त्याचे १५ वे एकदिवसीय शतक झळकावले होते. मात्र, वियान मुल्डरने विल्यमसनला एनगिडीच्या हाती झेलबाद केले. विल्यमसनने ९४ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह १०२ धावा काढल्यानंतर बाद झाला.
केन-रचिनने सावरला न्यूझीलंडचा डाव –
वृत्त लिहीपर्यंत न्यूझीलंडने ४४ षटकांत ४ बाद २७९ धावा केल्या आहेत. सध्या टॉम लॅथम (४) आणि ग्लेन फिलिप्स (८) खेळत आहेत. केन विल्यम्सन (१०२) आणि रचिन रवींद्र (१०८) यांनी दुसऱ्या विकेट्ससाठी १६४ धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडला २०० धावांचा टप्पा पार करता आला. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी कगिसो रबाडाने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत.





