आता नाकातून दिला जाणार करोना लसीचा डोस

नवी दिल्ली – भारत बायोटेकच्या इंट्रानेसल कोविड व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीच्या बूस्टर डोसला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. भारतात तयार करण्यात आलेली ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना बूस्टर स्वरूपात दिली जाणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डिसीजीआयने नोव्हेंबरमध्ये या लसीला मंजुरी दिली होती.
भारत बायोटेक या कंपनीने ही लस तयार केली असून नाकात दोन थेंब टाकले जाते. शेजारच्या चीनमधील करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता या लसीला परवानगी दिली गेली आहे. या लसीचे वैशिष्टय म्हणजे येथे इंजेक्शनची गरज भासत नाही आणि प्रशासनालाही ती सहजपणे उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच कोणा प्रशिक्षित व्यक्तीकडूनच लस घेतली पाहिजे असे नाही.
प्रत्येक व्यक्ती आपल्या हाताने ती घेऊ शकणार आहे. विज्ञान विषयक पत्र सेल आणि नेचरमध्ये केलेल्या दाव्यानुसार ही लस केवळ करोनापासून तुमचा बचावच करत नाही तर तुमची प्रतिकार शक्ती वाढवून तुमचा संसर्ग अन्य लोकांना होणार नाही याचीही खबरदारी घेते. नाक आणि गळा यांना जोडणाऱ्या भागावर ती प्रामुख्याने काम करते.





