Sanjay Raut : आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरु होणार.! बंडखोर खासदारांना संजय राऊत यांचा इशारा
राऊत म्हणाले की, आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरु होईल. तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणत आहात, पण असे पळणारे टायगर कधी असतात का?

Sanjay Raut | Operation Tiger – आता आमची लढाई ही लोकसभेत, कोर्टात आणि रस्त्यावर चालेल. रस्त्यावरची लढाई सुरु झाली आहे. आता आम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार आहोत, असा इशारा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
राऊत म्हणाले की, आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरु होईल. तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणत आहात, पण असे पळणारे टायगर कधी असतात का?
राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. गिरीश महाजन तुम्ही स्वातंत्र्य भोगताय ते काँग्रेसमुळे, असा टोला राऊत यांनी लगावला.
फुटीर खासदारांवरही राऊत यांनी हल्ला चढवला. फुटून गेलेले खासदार निवडणूक हरणार आहेत. त्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, आम्ही त्यांना गद्दार म्हणणार नाही, तुम्ही आमचे चिन्ह, आमच्या पैशावर निवडणूक जिंकलात.
या लोकांना आम्ही बेईमानी म्हणतो आणि बदमाशी म्हणतो. हे सगळे लोक पैशाने विकत गेले आहेत. काल रात्री त्यांना 10 कोटी रुपये दिले, आतापर्यंत त्यांना 25 कोटी रुपये मिळाले आहेत, असा दावा राऊत यांनी केला.
गद्दारांना सुरक्षा कशासाठी?
बंडखोर खासदारांना आणि नेत्यांना दिलेल्या सुरक्षेवरूनही राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. “जर तुमच्यात हिंमत आहे आणि तुम्हाला भीती नाही, तर मग तुमचे नगरसेवक ठाण्यात का लपवून ठेवता?
आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही असं म्हणता, मग या खासदारांना वाय प्लस सुरक्षा, सीआरपीएफची सेक्युरिटी का दिली आहे? त्यांच्या घरावर आणि मालमत्तेवर एवढा कडक बंदोबस्त कशासाठी? प्रत्येक गद्दाराला सुरक्षा देण्याचे कारण काय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “गिरीश महाजन यांनी पोलिसांच्या गाड्या बाजूला ठेवून समोर यावे. राडेबाजीवर आम्हाला आव्हान देऊ नका. एकदा सुरक्षा काढून बघा, तुमच्या अंगावर चिंधीही राहणार नाही.
तुमचे बॉस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः एवढी सुरक्षा घेऊन फिरतात, त्यांच्या चिरंजीवांकडेही (खासदार श्रीकांत शिंदे) मोठा सुरक्षा ताफा आहे.”
या संपूर्ण बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली असून, आगामी काळात ठाकरे गट आणि सत्ताधारी महायुतीमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






