Wimbledon 2025 : जोकोविचचा धमाकेदार विजय, फेडररचा विक्रम मोडत रचला इतिहास

Wimbledon 2025 Novak Djokovic Create History : नोव्हाक जोकोविच याने विम्बल्डन 2025 मध्ये आपला शानदार प्रवास कायम ठेवत डॅन इव्हान्सला सरळ सेट्समध्ये 6-3, 6-2, 6-0 असे पराभूत करत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या विजयासह जोकोविचने टूर्नामेंटमधील 99 वा सामना जिंकला आणि ओपन एरामध्ये 19 वेळा तिसऱ्या फेरीत पोहोचणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम दिग्गज रॉजर फेडररच्या नावावर होता, ज्याने 18 वेळा विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.
जोकोविचने फेडररला मागे टाकत रचला इतिहास –
38 वर्षीय जोकोविचने आतापर्यंत सात विम्बल्डन विजेतेपदे आणि एकूण 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. या प्रसंगी त्याने विनोदीपणे सांगितले की, 19 वेळा तिसऱ्या फेरीत पोहोचणे ही गोष्ट उत्कृष्ट आहे. ही संख्या कदाचित यानिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ यांच्या वयाइतकी असेल. विशेष म्हणजे, गेल्या दोन विम्बल्डन फायनल्समध्ये जोकोविचला हरवणारा अल्काराझ 22 वर्षांचा आहे, तर जगातील नंबर-1 खेळाडू सिनर 23 वर्षांचा आहे.
Pure passion ⚡️#Wimbledon pic.twitter.com/vnQ2tgNb2X
— Wimbledon (@Wimbledon) July 3, 2025
मीरा आंद्रिव्हाने लूसिया ब्रॉन्झेटीला हरवले –
महिला एकेरी गटातही रोमांचक सामने झाले. सातव्या मानांकित मीरा आंद्रिव्हाने इटलीच्या लूसिया ब्रॉन्झेटीला 6-1, 7-6 असे पराभूत करत पुढील फेरी गाठली. दहाव्या मानांकित एम्मा नवारोने एकतर्फी सामन्यात वेरोनिका कुदरमेतोव्हाला 6-1, 6-2 असे हरवले.
हेही वाचा – Grand Chess Tour : डी. गुकेशचा मास्टरस्ट्रोक! कार्लसनला कमजोर समजण्याची चूक पडली महागात
2022 ची विम्बल्डन विजेती एलेना रिबाकिना हिनेही उत्कृष्ट प्रदर्शन करत मारिया साकारीला 6-3, 6-1 असे पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डि मिनॉरने फ्रान्सच्या आर्थर काझॉक्सला 4-6, 6-2, 6-4, 6-0 असे हरवले, तर 19 व्या मानांकित ग्रेगोर दिमित्रोव्हने कॉरेंटिन मॉटेटवर 7-5, 4-6, 7-5, 7-5 अशा कडव्या लढतीत विजय मिळवला.





