Year Ender 2023 : ना विराट, ना रोहित..! ‘या’ दोन भारतीयांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’मध्ये मिळालंं स्थान…

Cricket Australia’s ‘Test Team of the Year’ : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवार, 31 डिसेंबर रोजी 2023 साठी ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ जाहीर केली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली किंवा कर्णधार रोहित शर्मा या दोघांनाही या संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, या यादीत दोन भारतीय खेळाडूंना आपले स्थान निर्माण करण्यात यश आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’मध्ये समाविष्ट होणारे दोन भारतीय हे दुसरे तिसरे कोणी नसून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन आहेत. या संघात जडेजाची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे, तर अश्विन स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाची भूमिका बजावणार आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या सीए (Cricket Australia) संघात ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडचे खेळाडू जास्त आहेत. होय, या संघात तीन इंग्लिश आणि दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले, त्यामुळे त्याला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
जर आपण संघावर एक नजर टाकली तर, cricket.com.au ने या संघाचे सलामीवीर म्हणून उस्मान ख्वाजा आणि दिमुथ करुणारत्ने यांची निवड केली आहे. हे वर्ष दोन्ही फलंदाजांसाठी छान ठरले. ख्वाजा या वर्षी रेड क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1,210 धावा करणारा फलंदाज होता, तर करुणारत्नेने 60.80 च्या सरासरीने 608 धावा केल्या. केन विल्यमसनला तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. या संघाची मधली फळी आयर्लंडचा लॉर्कन टकर, हॅरी ब्रूकसह जो रूट सांभाळणार आहे. टकर हा या संघाचा यष्टिरक्षकही असेल. संघातील एकमेव अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आहे, तर गोलंदाजीचा भार कर्णधार पॅट कमिन्ससह कागिसो रबाडा, स्टुअर्ट ब्रॉड आणि आर अश्विन यांच्या खांद्यावर असेल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ – उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, केन विल्यमसन, जो रूट, हॅरी ब्रूक, लॉर्कन टकर(यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, पॅट कमिन्स (कर्णधार), कागिसो रबाडा, स्टुअर्ट ब्रॉड





