Mallikarjun Kharge : दिल्ली नव्हे, गुन्हेगारांची राजधानी.! मल्लिकार्जुन खर्गे यांची जोरदार टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यकाळात दिल्ली गुन्हेगारीची राजधानी बनल्याचा आरोप करत काँग्रेसने वाढती अराजकता रोखण्यासाठी गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलीस काय करत आहेत? असा सवाल केला.

Mallikarjun Kharge – मणिपूरमधील प्रसिद्ध संगीतकार चोंगथम विक्रम सिंग यांच्या दिल्लीतील हत्येवरून काँग्रेसने मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यकाळात दिल्ली गुन्हेगारीची राजधानी बनल्याचा आरोप करत काँग्रेसने वाढती अराजकता रोखण्यासाठी गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलीस काय करत आहेत? असा सवाल केला.
५४ वर्षीय विक्रम सिंग यांचा सोमवारी पहाटे किलोकारी येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, घराबाहेर काही डिलिव्हरी कर्मचारी आणि ढाब्यावरील कामगार मद्यपान करून गोंधळ घालत होते.
सिंग यांनी आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मुलगा याइफाबा यांनी त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि परिस्थितीचा तपास सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या घटनेला निर्दयी हत्या असे म्हणत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
दिल्लीतील गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने चिंताजनक असल्याचा दावा करत त्यांनी मणिपूरमधील लोकांना राज्याबाहेरही त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले.
राहुल यांची चौकशीची मागणी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही तातडीने चौकशीची मागणी केली. ईशान्य भारतातील प्रत्येक कुटुंब आज आम्ही येथे सुरक्षित आहोत का, असा प्रश्न विचारत आहे, असे त्यांनी म्हटले.
प्रियांका गांधी वाड्रा यांनीही ही घटना राष्ट्रीय लज्जेची बाब असल्याचे सांगत दोषींवर त्वरित कारवाईची मागणी केली. दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स सोसायटीने सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.






