Nordea Open 2024 : ऑलिम्पिकपूर्वी नदाल फॉर्ममध्ये परतला, नॉर्दिया ओपनच्या अंतिम फेरीत मारली धडक….

Nordea Open 2024 : राफेल नदालने शनिवारी नॉर्दिया ओपनमध्ये उपांत्य फेरीच्या लढतीत दुजे अजदुकोविचचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करून 2022 फ्रेंच ओपननंतर पहिल्यादाच अंतिम फेरी गाठली आहे. नदालने यापूर्वी क्ले कोर्टवर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चार तास चाललेल्या लढतीत 36व्या मानांकित मारियानो नॅव्हॉनचा 6-7, 7-5, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर त्याने शानदार पुनरागमन करत अजदुकोविचविरुद्ध विजय मिळवला. नदालने 2005 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी नॉर्दिया ओपनचे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर तो प्रथमच नॉर्दिया ओपन खेळत आहे.
तो पॅरिसमधील रोलँड गॅरोस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची तयारी करत आहे. त्याने पहिल्या फेरीत स्वीडिश महान ब्योर्न बोर्गचा मुलगा लिओ बोर्ग याचा पराभव केला. 38 वर्षीय नदालने विम्बल्डनमध्ये भाग घेतला नव्हता, कारण गेल्या दीड वर्षांपासून तो हिप आणि पोटाच्या दुखापतीने त्रस्त आहे.





