Narendra Modi : “कोणत्या जागतिक नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवले नाही”; पंतप्रधान मोदींनी केले स्पष्ट

Parliament Monsoon Session 2025 | Narendra Modi – पाकिस्तानसोबत युद्धबंदी दोन्ही देशांमधील चर्चेनंतर झाली आणि त्यात कोणत्याही जागतिक नेत्याची भूमिका नव्हती अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले.
राहुल गांधी म्हणाले होते की ऑपरेशन सिंदूर दरम्यान सरकारने पायलटचे हात बांधले होते. याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्हाला सैन्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही सैन्याला मोकळीक दिली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, आम्ही दहशतवादाच्या मालकांना योग्य उत्तर देण्याचा संकल्प केला होता. आम्ही दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना कल्पनेपलीकडे शिक्षा करण्याचा आणि दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा संकल्प केला होता.
पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच लोकसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी कथित युद्धबंदी घडवून आणली हे दावे फेटाळून लावले. पंतप्रधान म्हणाले की जगातील कोणत्याही देशाने भारताला त्याच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखलेले नाही.
अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यांनी त्यांना सांगितले होते की पाकिस्तान मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहे आणि मी त्यांना सांगितले होते की त्यांना (पाकिस्तान) जास्त किंमत मोजावी लागेल.
पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केलेला नाही असे विरोधी पक्षांकडून बोलले जाते आहे. यावर पंतप्रधान मोदींनी सभागृहात सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी फक्त तीन देशांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ निवेदन दिले होते. क्वाड असो, ब्रिक्स असो, कोणताही देश असो, भारताला जगभरातून पाठिंबा मिळाला.
मी परराष्ट्र धोरणावर स्पष्टपणे बोलत आहे, मला जगाचा पाठिंबा मिळाला, परंतु दुर्दैवाने माझ्या देशाच्या वीरांच्या शौर्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करून विरोधक माध्यमांमध्ये मथळे मिळवू शकतात, परंतु देशवासीयांच्या हृदयात स्थान मिळवू शकत नाहीत.





