पूल नाही तर मतदान नाही…! अरुणाचल प्रदेशमधील 3 गावांची धमकी

इटानगर – गावातील नदीवर पक्का पूल बांधला गेला नाही, तर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याची धमकी अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम सियांग जिल्ह्यातील 3 गावांनी दिली आहे. पिसम या नदीच्या हिजूम या उपनदीवर पक्का पूल बांधण्यात यावा, अशी या तिन्ही गावकऱ्यांची 2014 पासूनची मागणी अजूनही प्रलंबित आहे.
2011 च्या जनगणनेनुसार अरुणाचल प्रदेशची एकूण लोकसंख्या फक्त 13 लाख 84 हजार इतकी आहे. रिमे मोको, पिदी रिमे आणि तोडी रिमे या तिन्ही गावांची मिळून एकूण लोकसंख्या अवघी 400 आहे. त्यापैकी अंदाजे 300 जण मतदार आहेत.
गावातील नदी ओलांडण्यासाठी गावकऱ्यांनी अंदाजे एक मीटर लांबीचे 20 लाकडी ओंडके आणि दोरीच्या सहाय्याने एक कामचलाऊ पूल बांधला आहे. या पूलाला एकाच बाजूला दोरीचा आधार आहे. मात्र हा पूल देखील पावसाळ्यात कुचकामी ठरतो. कारण नदीच्या पाम्याची पातळी वाढल्यावर हा पूल पाण्याखाली जातो.
जेंव्हा या नदीला पूर येतो तेंव्हा गावकरी आपल्या मुलांना शाळेत सोडत नाहीत. जरी पाऊस नसला तरी रुग्णांना रुग्णालयात नेणेही अवघड असते, असे गावकऱ्यांनी सांगितले. रुगअमांना पाठीवरून निक्ते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत वाहून न्यावे लागते. रस्त्यांच्या गैरसोयीमुळे या गावांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासालाही फटका बसतो आहे.
या तिन्ही गावांच्या गावकऱ्यांनी मिळून अलिकडेच एक ठराव केला आणि पक्क्या पूलाची मागणी राज्य सरकारकडे केली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तोबासोरा ते रिमे मोकू आणि न्योराक आणि तोडे रिमेपर्यंतच्या रस्त्यांची मागणीही केली गेली आहे.
या मागण्यांची पूर्तता केली गेली नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा या तिन्ही गावांमधील गावकऱ्यांनी एकमताने दिला आहे, असे रिमे मोको गावचे ग्रामप्रमुख गांबिन रिमे यांनी सांगितले.





